नागपूरमध्ये खेळाडूंच्या जेवणात किडे, होस्टेल अस्वच्छ

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूरला ३९ वर्षानंतर राज्य शालेय मैदानी स्पर्धेचे यजमानपद मिळाले. मात्र स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच अनेक अनपेक्षित घटना घडल्याने स्पर्धेचा दर्जा घसरला आहे. आलेल्या खेळाडूंसाठी बनवलेल्या जेवणात किडे आणि अळ्या आढळल्याने खेळाडूंकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही विद्यार्थिनींची छेड काढल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

राज्य शालेय स्पर्धेसाठी नऊ विभागातून हजाराहून अधिक मुली नागपुरात दाखल झाल्या आहेत. या मुलींची राहण्याची व्यवस्था मानकापूर येथील विभागीय क्रिडा संकुल व क्रीडा प्रबोधिनीमध्ये करण्यात आली आहे. संकुल परिसरातील वसतिगृहात भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. सहभागी खेळाडूंना अत्यंत निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याची तक्रार बुधवारी आलेल्या खेळाडू व शिक्षकांनी केली. क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि लिपीक महेश पडोळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली, मात्र या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. सकाळच्या सुमारास काही विद्यार्थिनींना भात व भाजीमध्ये अळ्या आढळून आल्या. यासंबंधी विद्यार्थिनींनी आपापल्या विभागाच्या शिक्षकांना माहिती दिली. शिक्षकांनी कॅटर्स मालकाकडे तक्रार केल्यानंतर अरेरावीची भाषा वापरल्याचाही आरोप शिक्षकांनी केला. भात, भाजीसोबतच पोळ्या देखील निकृष्ट दर्जाच्या असल्याचे निदर्शनास आले आहे. पिण्याच्या पाण्याचीही स्थिती अशीच होती.

मंगळवारी रात्री प्रत्येक खेळाडूला अंथरायला गादी देण्यात आली. परंतु पांघरायला काहीच न दिल्याने त्यांना थंडीत रात्र काढावी लागली. वीज,पंखे नसलेल्या खोलीत राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या खेळाडूंना डासांमुळे रात्रभर त्रास सहन करावा लागला. मंगळवारी रात्री दाखल झालेल्या विद्यार्थिसोबत छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला. संबंधीत प्रकाराची चौकशी करण्यासाठी पोलिसांनादेखील बोलवण्यात आले.

स्वच्छतागृहात असलेल्या अस्वच्छतेमुळे आलेल्या खेळाडूंची गैरसोय होत आहे. अ‍ॅथलेटिक्सच्या सिंथेटिक मैदानात एक हजार महिला खेळाडूंसाठी १० बाय १० फुटांचे टॉयलेट आहे, परंतु त्या टॉयलेटला चादर गुंडाळून बनविण्यात आले. महानगर पालिकेचा एक दुर्गंधीने भरलेला मोबाईल टॉयलेट अशा ठिकाणी उभा करण्यात आला जिथे दिवसभरात एकही खेळाडू पोहचू शकला नाही. विभागीय क्रीडा संकुलच्या होस्टलमध्ये प्रत्येक माळयावर चार टॉयलेट आहेत, परंतु तिथल्या शौचालयाच्या कडी गायब आहेत.