मथुरेप्रमाणे सजते ‘हे’ गाव आणि कंसमामा करतो राज्य!


सामना ऑनलाईन । बारगढ

ओदिशातील बारगढमध्ये सध्या धनुर्यात्रा सुरू आहे. या यात्रेत भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील काही अध्यायांचे चित्रण करण्यात येते. या यात्रेसाठी बारगढ जिल्हा मथुरेप्रमाणे सजवण्यात येतो. मात्र, यात्रेचे विशेष म्हणजे या कृष्णलीलेचा नायक श्रीकृष्ण नसून त्याचा मामा कंस नायक असतो. या कथेत कंसमामा दुष्ट नसून तो समाजसेवक आणि समजासुधारकाप्रमाणे काम करतो. धनुर्मासातील 11 दिवस ही यात्रा चालते.

या यात्रेत श्री कृष्णापेक्षा कंसमामावरच सगळ्यांचे लक्ष असते. या यात्रेत कंस हाच या राज्याचा राजा असतो. या कंसमामाने यंदाच्या यात्रेत आपल्या न्यायालयात थेट केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. कंसमामाच्या आदेशाचे पालन करत प्रधान 15 जानेवारीला कंसमामासमोर हजर झाले. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी बायोफ्युएल योजनेबाबत आणि त्याच्या उपयुक्ततेबाबत बारगढमधील जनतेला माहिती देण्याचे फर्मान कंसमामाने सोडले. प्रधान यांनी जनतेला याबाबतची माहिती दिली. बायोफ्युइसाठी लागणाऱ्या इंधनाला म्हणजे धान्याच्या भुशाला चांगला भाव देण्याचे आश्वासन प्रधान यांनी शेतकऱ्यांना द्यावे असेही कंसमामाने प्रधान यांना सांगितले. त्याप्रमाणे प्रधान यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

या यात्रेत बारगढला मथुरा, अंबापालीला गोपापुरा आणि जीरा नदीला यमुना मानण्यात येते. यात्रेच्या काळात कंसमामा या राज्यात फिरून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड करतो. दंडाची रक्कम आयोजन समिताला देण्यात येते. कंसमामा करत असलेल्या समाजसुधारणेच्या कामांमुळे जनतेच्या भावना या यात्रेशी जोडल्या गेल्या आहे. केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांना बालावून कंसमामाने जनतेला बायोफ्युएलची महती सांगितली. तसेच जनतेच्या तक्रारीवरून कंसमामाने वीज कंपनीच्या अधीक्षकांनाच बोलावले होते. तसेच मथुरेत वीज खंडित का होते, याबाबत त्यांना विचारणा केली होती. पॉलिथॉन आणि प्लॅस्टिकमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान लक्षात घेत जनतेने त्याचा वापर टाळावा असे आवाहनही या राजाने जनतेला केले. महाभारतात कंसमामाचा दुष्टमामा असा उल्लेख असला तरी या यात्रेत तो खऱ्या अर्थाने जनतेचा राजा असतो. जनतेलाही असाच राजा असावा असे वाटते.