पुण्यात २० कुत्र्यांची हत्या, ४ कुत्र्यांना जीवंत जाळले

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्याच्या बाणेरमध्ये अज्ञातांनी २० कुत्र्यांची हत्या केली. धक्कादायक म्हणजे ४ कुत्र्यांना जीवंत जाळण्यात आले तर १६ कुत्र्यांना विषप्रयोग करुन मारण्यात आले. प्राणीप्रेमींनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी कुत्र्यांच्या मारेकऱ्यांना शोधून अटक करावी अशी मागणी प्राणीप्रेमी करत आहेत.

बाणेरच्या निर्जन भागात २० कुत्र्यांची हत्या करण्याचा प्रकार घडला. मारण्यात आलेले कुत्रे कोणाच्या जीवावर उठले होते म्हणून त्यांना ठार करण्यात आले?, असा प्रश्न प्राणीप्रेमी विचारत आहेत.

पुण्यात कागदोपत्री सुमारे ४० हजार कुत्र्यांची नोंद आहे. पण पुण्यात लाखाच्यावर कुत्रे असल्याची शक्यता नागरिक बोलून दाखवत आहेत. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यातील ६,३५८ नागरिकांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत. मोकाट आणि आजारी कुत्र्यांना आवरण्याची मागणी पुणेकर करत आहेत. मात्र निर्बिजिकरणासारखे उपाय उपलब्ध असताना तसेच चावा जीवघेणा ठरू नये म्हणून लसीकरणाचा पर्याय उपलब्ध असताना कुत्र्यांना क्रूरपणे ठार मारण्याचा प्रकार घडल्यामुळे पुणेकर धास्तावले आहेत.