रायगडात महिला असुरक्षित, पोलिसांनीच जाहीर केला अहवाल

सामना ऑनलाईन । अलिबाग

औद्योगिकीकरणामुळे रायगडात एकीकडे विकासाचा डंका वाजत असतानाच दुसरीकडे गुन्हेगारी वाढल्याचे पोलिसांनीच जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. परप्रांतातून रायगडात आश्रयाला येणारे नागरिकांचे आणि कामगारांचे लोंढे यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे महिलांवरील अत्याचारही वाढल्याचा पोलिसांचाच अहवाल असून गस्ती पथक, दामिनी पथक करतेय काय, असा सवाल विचारला जात आहे.

क्राइम रिपोर्ट

महिलांवरील अत्याचार वाढले असले तरी पोलिसांनी केलेली प्रतिबंधात्मक कारवाई आणि गस्तीचे वाढवलेले प्रमाण यामुळे खून, दरोडय़ात मात्र काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे.
२०१६ –
२ हजार ७५८ गंभीर गुह्यांची नोंद – ३७ हत्या, १० दरोडे, ६३ जबरी चोऱया
२०१७ –
२ हजार ५५१ गंभीर गुन्हे – १६ हत्या, ९ दरोडे, ३८ जबरी चोऱया

– रायगड जिह्यात वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाणही गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे.

– चोऱ्या, घरफोड्य़ा, खून, दरोडे या गुह्यांची आकडेवारी वाढली. याचबरोबर महिलाही असुरक्षित असल्याचे पोलिसांनीच जाहीर केलेल्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे.

– २०१६ मध्ये वर्षभरात रायगडात बलात्काराच्या ५७ घटना घडल्या आहेत. १११ महिलांचे विनयभंग झाले तर ८३ महिलांचे अपहरण झाल्याच्या घटनेची नोंद झाली आहे.

– २०१७ च्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या घटना वाढल्या असून ११९ महिलांचा विनयभंग तर ९७ महिलांचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे.