सहा महिन्यांत जिल्हा परिषदेच्या शाळा स्वयंपूर्ण होणार

सामना प्रतिनिधी । बदलापूर

स्वयंपूर्ण शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यांना उपयुक्त सोयी पुरवल्या जाणार असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनकर यांनी केले. पाटगाव येथे अंबरनाथच्या माजी नगरसेविका सुमती पाटील व रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे संचालक डॉ. राहुल चौधरी यांनी अंबरनाथ व मुरबाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या १५ गावांना शैक्षणिक कामांसाठी दत्तक घेतले. या दत्तक योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात भीमनकर बोलत होते.

ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना लागणाऱ्या मूलभूत सुविधांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह बांधून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार असल्याचेही भीमनकार यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील शाळांच्या विजेचा प्रश्न आता कायमस्वरूपी सोडविण्यात आलेला असून वीज बिल न भरल्यामुळे अनेक शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. हे चित्र बदलण्यासाठी संबंधित गावातील ग्रामपंचायतींना शाळा आणि अंगणवाड्यांच्या विजेची बिले अदा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, तसा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहितीही भीमनकर यांनी दिली. प्रत्येक शाळा स्वयंपूर्ण आणि शंभर टक्के डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न असून सुमती पाटील आणि डॉ. राहुल चौधरी यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींचे योगदानसुद्धा अतिशय महत्त्वाचे असल्याचे भीमनकर यांनी सांगितले.