स्थायी समिती सभापतींचा पहिल्याच चिठ्ठीत ‘घात’

सामना प्रतिनिधी ,पिंपरी,पुणे

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांना चिठ्ठी सोडतीद्वारे बाहेर पडावे लागले आहे. या चिठ्ठीने स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांची पहिलीच ‘विकेट’ घेतली. त्यांच्यासोबतच कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवाणी, हर्षल ढोरे, आशा शेंडगे (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर यांचा ‘घात’ केला.

फेब्रुवारी २०१७मध्ये महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यानंतर मार्चमध्ये स्थायी समितीवर राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार १६ सदस्यांची नियुक्ती केली. त्यात सत्ताधारी भाजपच्या दहा सदस्यांसह राष्ट्रवादीच्या चार, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महाराष्ट्र महापालिका प्रांतिक अधिनियमानुसार स्थायी समितीच्या आठ सदस्यांना २८ फेबु्रवारीच्या आत चिठ्ठी पद्धतीने निवृत्त करण्याची तरतूद आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची कार्यवाही २८ फेबु्रवारीच्या आतच करणे बंधनकारक आहे. त्याची पूर्वप्रक्रिया नगरसचिव कार्यालयाकडून सुरू केली. बुधवारच्या (दि. ७) साप्ताहिक सभेत सोडत काढली. ज्या पक्षाचे सदस्य बाहेर पडलेत, त्या पक्षाचे तेवढेच नवीन सदस्य नव्याने स्थायी समितीत घेतले जाणार आहेत. सभेच्या सुरुवातीलाच ‘पारदर्शकपणे’ पत्रकारांच्या हस्ते ही सोडत काढली.

स्थायी समिती सभापती सीमा सावळे, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, हर्षल ढोरे, आशा शेंडगे, कोमल मेवाणी या भाजपच्या सहा, तर राष्ट्रवादीच्या अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर यांच्या नावांच्या चिठ्ठ्या निघाल्या. त्यांचा कार्यकाल २८ फेब्रुवारीपर्यंतच सीमीत झाला आहे, तर लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे हे भाजपचे, तर मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ हे राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे अमित गावडे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांना दुसऱ्या वर्षीही स्थायीत काम करण्याची संधी मिळणार आहे.