दीपिकाची कमाई रणवीरपेक्षा जास्त!

दीपिका पदुकोण व रणवीर सिंग यांनी आज लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले

सामना ऑनलाईन, मुंबई

वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदुस्थानच्या सेलिब्रिटींमध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने सलग तिसऱ्या वर्षी ‘फोर्ब्ज इंडिया’च्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. दीपिका पदुकोणची कमाई तिचा पती अभिनेता रणवीर सिंह याच्यापेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे. 2018च्या ‘फोर्ब्ज इंडिया’च्या यादीत दीपिका चौथ्या, तर रणवीर आठव्या स्थानावर आहे.

हिंदुस्थानच्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या सलमानचे वार्षिक उत्पन्न 253.25 कोटी रुपये इतके आहे. विराट कोहली 228.09 कोटी कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र गेल्या वर्षी दुसऱ्या स्थानावर असलेला शाहरुख खान यंदा 56 कोटी कमाईसह 13व्या स्थानावर घसरला आहे, तर गेल्या वर्षी 68 कोटी कमाईसह सातव्या स्थानावर असलेली प्रियांका चोप्रा यंदा 18 कोटी उत्पन्नामुळे थेट 49व्या स्थानावर गेली आहे.