शशिकला यांच्या घर आणि १८७ ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे

सामना प्रतिनिधी, चेन्नई

भ्रष्टाचाराच्या खटल्यात कारावासाची शिक्षा झाल्याने सध्या तुरुंगात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांच्या जया टीव्हीच्या कार्यालयासह तामिळनाडूतील १८७ मालमत्तांवर आयकर विभागाने गुरुवारी सकाळी धाडी घातल्या. शशिकला यांचे कुटुंबिय, समर्थक आणि माजी मुख्यमंत्री स्व.जयललिता यांच्या कोदांद इस्टेटसह राज्यभरातील अनेक ठिकाणांवरही धाडी पडल्या. आयकर विभागाची ही कारवाई शशिकला आणि त्यांच्या समर्थकांसाठी मोठा झटका असल्याचे मानले जाते.

आयकर विभागाच्या १० अधिकाऱ्यांनी पहाटे सहा वाजताच जया टीव्हीच्या कार्यालयावर छापा मारला. ही कारवाई राजकीय हेतूने केली आहे, असा आरोप शशिकला यांच्या समर्थकांनी केला आहे. ‘ऑपरेशन क्लीन मनी’ या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. एकाच वेळी ८० ठिकाणांवर धाडी घातल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. करचोरीची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरु केल्याचे सांगून जया टीव्ही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व्यवहारांवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.