झवेरी बाजारात आयकर विभागाची छापेमारी

मुंबई – आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी झवेरी बाजारात छापे टाकले. झवेरी बाजारातील तीन बडे व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर असून सुमारे १०० कोटी रुपये पांढरे केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चलनातून बाद झालेल्या जुन्या ५०० आणि १०००च्या नोटा कर्मचार्‍यांच्या खात्यात भरून तसेच बोगस कंपन्यांच्या नावाने सोनेविक्री करून तीन व्यापार्‍यांनी चुना लावल्याचा आयकर अधिकार्‍यांना संशय आहे.

नोटाबंदीनंतर अनेकांनी बुलियन आणि ज्वेलर्सचा आधार घेत काळा पैसा पांढरा केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. झवेरी बाजारातील काही व्यापार्‍यांच्या खात्यामध्ये कोट्यवधीची रक्कम जमा झाल्याचेही निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर आयकर विभागाने झवेरी बाजारातील तीन बड्या व्यापार्‍यांच्या दुकानांवर छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत ही छापेमारी सुरू होती. याआधी ईडीनेदेखील झवेरी बाजारात छापे टाकून व्यापार्‍यांवर कारवाई केली होती.