करचोरीप्रकरणी जया टीव्हीसह ८० ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापे

सामना ऑनलाईन । चेन्नई

करचोरी केल्याप्रकरणी आयकर विभागाने आज व्ही. के. शशिकला आणि टी. व्ही. दिनाकरन यांना झटका दिला. शशिकला – दिनाकरन यांचे नियंत्रण असलेल्या जया टीव्ही या तामीळ टीव्ही चॅनेलवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज सकाळी ६.३० वा. धाड टाकली. याचबरोबर दिनाकरन यांचे पुदुचेरीमधील फार्म हाऊस, शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्या घरांवरही इन्कम टॅक्सने छापे मारल्याने तामीळनाडूमध्ये खळबळ उडाली आहे.

कर चुकवेगिरीप्रकरणी जया टीव्ही आणि या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे, असे आयटीच्या अधिकाऱयांनी सांगितले. ‘जया’ टीव्ही हे अण्णा द्रमुकचे चॅनेल आहे. या चॅनेलविरुद्ध कर चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर या धाडी पडल्या आहेत. तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी हे चॅनेल सुरू केले होते.

दिनाकरन यांची केंद्रावर टीका
अशा प्रकारच्या धाडी टाकून आम्ही यांना उद्ध्वस्त करू शकतो असे केंद्र सरकार समजत असेल तर ते दिवास्वप्न पाहत आहेत, अशी संतप्त टीका दिनाकरन यांनी या धाडीवर बोलताना केली आहे. राजकारणातून मला आणि शशिकला यांना हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही दिनाकरन यांनी केला आहे.

धाडीमागे राजकारण
अण्णा द्रमुकवर नियंत्रण मिळण्यावरून सध्या शशिकला-दिनाकरन आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. पलानीस्वामी, पनीरसेल्वम यांना भाजपचा पाठिंबा आहे. यामुळे या धाडीमागे राजकारण असल्याची राज्यात चर्चा आहे.