रखडलेला विर्डी लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होणार

सामना प्रतिनिधी, दोडामार्ग

गेली बारा वर्षे रखडलेल्या दोडामार्ग तालुक्यातील विर्डी या लघु पाटबंधारे प्रकल्पास १४६ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आली असून या प्रकल्पामुळे तालुक्यातील विर्डी, आयी, वझरे, गिरोडे व तळेखोल या पाच गावातील ३ हजार ३६२ एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे व परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दोडामार्ग तालुक्यातील विर्डी लघु पाटबंधारे प्रकल्प या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे पूर्ण होणार आहे. प्रकल्पाच्या बांधकामा दरम्यान झालेल्या दर सूचीतील बदल, भूसंपादनाच्या वाढलेल्या किंमती व संकल्प चित्रातील बदल तसेच खर्चामुळे प्रकल्पाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ पाहता २००५ मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता ४३ कोटी रुपयांची होती. त्यानंतर आता तब्बल बारा वर्षांनी विर्डी या लघु पाटबंधारे प्रकल्पाला प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या योजनेवर आतापर्यंत ६६ कोटी रुपयांचा खर्च झाला असून हा रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर १४६ कोटी रुपये सुधारित प्रशासकीय निधीला राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. तिलारी प्रकल्पानंतर दोडामार्गातील विर्डी हा दुसरा पाटबंधारे प्रकल्प होत असून या प्रकल्पामुळे दोडामार्ग परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागणार आहे.