उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘इन्क्युबेशन सेंटर’ स्थापन करणे अनिवार्य, एआयसीटीईचे निर्देश

1

सामना ऑनलाईन । मुंबई

विद्यार्थी आणि शिक्षकांचा उद्योगपती, व्यावसायिक यांच्याशी सतत संवाद व्हावा. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांमधून संशोधनाला चालना मिळावी आणि त्यातून स्टार्ट-अप कंपन्या सुरू करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रत्येक उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठामध्ये ‘इन्क्युबेशन सेंटर’ स्थापन करणे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अनिवार्य केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एआयसीटीईने यासंदर्भात सर्व उच्च शिक्षण संस्थांना परिपत्रक पाठवले आहे. त्यात आयटी संस्था आणि बिझनेस स्कूल यांचाही समावेश आहे. इन्क्युबेशन सेंटर अनिवार्य करतानाच एआयसीटीईने इतरही काही सूचना दिल्या आहेत. एआयसीटीईकडे येणाऱ्या जर्नल्सचा दर्जा घसरला असून संशोधनावर अधिकाधिक भर देण्यास सांगण्यात आले आहे. संशोधनासाठी अर्थसंकल्पांमध्ये निधीची तरतूद करावी आणि संशोधकांना अर्थसहाय्य पुरवावे असेही एआयसीटीईने सांगितले आहे.