… तर कोहली द्रविडचा 16 वर्ष जुना विक्रम मोडणार


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली पाच कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने 3-1 अशी गमावली आहे. मालिका गमावली असली तरी टीम इंडियासाठी चांगली बाब म्हणजे कर्णधार विराट कोहलीचा दमदार फॉर्म. विराटने या मालिकेमध्ये धावांचा पाऊस पाडला असून राहुल द्रविडचा 16 वर्ष जुना विक्रम मोडण्याच्या जवळ आला आहे.

टीम इंडियात वादाची ठिणगी, रोहितने विराटला केले अनफॉलो

विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध पहिल्या चार कसोटीतील आठ डावांमध्ये फलंदाजी करताना 2 शतक आणि 3 अर्धशकांच्या मदतीने 544 धावा चोपल्या आहेत. मालिकेत सर्वाधिक धावा विराटच्याच नावावर असून याच कामगिरीमुळे कसोटी क्रमवारीत तो सध्या पहिल्या स्थानावर विराजमान आहे. यासह इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंच्या यादीत तो सध्या दुसऱ्या स्थानावर असून शेवटच्या कसोटीत आणखी 59 धावा काढताच तो पहिल्या स्थानावर येईल. सध्या इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे.

इंग्लंडमध्ये एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे हिंदुस्थानी खेळाडू –
राहुल द्रविड – 602 धावा (2002)
विराट कोहली 544 धावा (2018)
सुनील गावसकर 542 धावा (1979)
राहुल द्रविड – 461 धावा (2011)

कोहलीची ‘विराट’ कामगिरी
विराट कोहलीने आतापर्यंत 70 कसोटीत 120 डावांमध्ये फलंदाजी करताना 6098 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 23 शतकांचा आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच विराटने 6 द्विशतकही ठोकले आहेत. एक दिवसीय क्रिकेटमध्ये विराटने 211 सामन्यात 9779 धावा चोपल्या असून यात त्याच्या 35 शतकांचा आणि 48 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 मध्ये विराटच्या नावावर 62 सामन्यात 2012 धावांची नोंद असून यात त्याच्या 18 अर्धशतकांचा समावेश आहे.