टीव्ही फोडणाऱ्यांची देशभक्ती

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अशा देशांबरोबर आपण क्रिकेट खेळतो व हरतो तेव्हा हे टीव्ही वगैरे फोडण्याचे प्रकार घडत नाहीत. पाकिस्तानच्याच बाबतीत ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. कारण शेजारचे राष्ट्र हे दुश्मन राष्ट्र असल्याचे हिंदुस्थानातील सवाशे कोटी लोकांनी मान्य केले आहे. मात्र पाकिस्तानने आम्हाला क्रिकेटच्या मैदानात हरवल्याचा संताप येणाऱ्यांनो, कधी तरी कश्मीरात शहीद होणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थदेखील संतापून रस्त्यावर उतरा! देशभक्ती म्हणजे फक्त नोटाबंदीचे समर्थन नाही व टीव्ही फोडणे नाही!

क्रिकेटच्या मैदानावर पाकड्यांनी हिंदुस्थानी संघास पराभूत केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘फायनल’ला आपल्या फलंदाजांनी लंडनच्या ओव्हल मैदानावर लेंड्या टाकल्याने देशभरात म्हणे संतापाच्या ठिणग्या उडाल्या आहेत. खेळामध्ये जय-पराजय व्हायचेच. जो संघ राष्ट्रीय भावनेने चांगला खेळेल तोच जिंकेल, ही खिलाडूवृत्ती आपण स्वीकारायलाच हवी. पण खेळ पाकिस्तानबरोबर असतो तेव्हा त्यास धर्मयुद्धाचे स्वरूप येते. अर्थात हे फक्त क्रिकेटच्याच बाबतीत होते. ओव्हल मैदानावर पाकडय़ांकडून आपला क्रिकेट संघ बेदम मार खात असताना जागतिक हॉकी लीग स्पर्धेत हिंदुस्थानी हॉकी संघाने पाक हॉकी संघास ७-१ ने पराभूत केले. या विजयाचा आनंद आमच्या चेहऱ्यावर का झळकू नये? पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना हरलो म्हणून आमच्याकडील तथाकथित देशभक्तांनी आपल्या क्रिकेटपटूंचा निषेध केला. त्यांचे पुतळे जाळले. रागाने घरातील टीव्ही रस्त्यावर आणून फोडले. क्रिकेटपटूंच्या नावाने शिमगा केला. हा सर्वच प्रकार आता हास्यास्पद ठरत आहे. मग हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचा धिक्कार करणारे हे देशभक्त पाकड्यांच्या हॉकी संघाला पराभूत करणाऱ्या हिंदुस्थानी हॉकीपटूंचा जयजयकार करण्यासाठी रस्त्यावर का उतरले नाहीत? पाकिस्तानचा क्रिकेट संघ जिंकल्यावर

कश्मीर खोऱ्यात

म्हणे अत्यानंदाचे भरते आले व फटाक्यांची आतषबाजी झाली. फुटीरतावादी नेता मिरवाईझ उमर फारुख याने ‘कश्मीरात जणू ईद लवकर आली असे वाटते. फटाके फुटत आहेत. पाकिस्तानी संघाचे अभिनंदन,’ असे सांगून बेइमानांची जात दाखवली. यावर आपल्याकडील क्रिकेटपटूंनी त्यास ट्विटरवर उत्तर दिले व राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली. हे सर्व ठीकच आहे, पण त्याहीपेक्षा हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पाकड्यांविरुद्ध खेळण्यास सरळ नकारच दिला असता तर त्यांच्या राष्ट्रभक्तीने देश जास्त रोमांचित झाला असता. मात्र एकाही क्रिकेटपटूने पाकविरुद्ध खेळण्यास नकार दिला नाही. राष्ट्रासाठी त्याग केला नाही. बंडाचे निशाण फडकविले नाही व इकडे देशभक्त मंडळी मात्र रस्त्यावर टीव्ही फोडण्याचा पराक्रम गाजवत बसली. खरे म्हणजे खेळामध्ये जो चांगला खेळेल तोच जिंकेल. त्यात चुकीचे ते काय? पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अशा देशांबरोबर आपण क्रिकेट खेळतो व हरतो तेव्हा हे असे टीव्ही वगैरे फोडण्याचे प्रकार घडत नाहीत. पाकिस्तानच्याच बाबतीत ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. कारण शेजारचे राष्ट्र हे दुश्मन राष्ट्र असल्याचे हिंदुस्थानातील सवाशे कोटी लोकांनी मान्य केले आहे. पाकड्यांना क्रिकेटच्या मैदानावर लोळवायलाच हवे असा विचार ज्यांच्या मनात आहे त्यांच्याविषयी भाष्य करायची आमची इच्छा नाही. कारण

पाकडय़ांबरोबर कोणतेही संबंध

ठेवणे म्हणजे कश्मीर खोऱ्यात शहीद होणाऱ्या आमच्या हजारोजवानांचा अपमानच आहे, असे आम्हाला वाटते. क्रिकेट खेळल्याने पाकडय़ांशी संबंध सुधारतील या स्वप्नरंजनातून देशाने बाहेर पडले पाहिजे. दुसरीकडे पाकडे जिंकले म्हणून ज्यांनी टीव्ही फोडले त्यांनी खरे म्हणजे पाकिस्तानबरोबरचा सामना पाहण्यापेक्षा टीव्ही बंद करून ‘ब्लॅक आऊट’ करायला हवा होता. तसे केले असते तर ती खरी देशभक्ती म्हणता आली असती. सवाशे कोटी देशवासीयांनी हा बहिष्कार टाकला असता तर कश्मीरात शहीद झालेल्या जवानांना व निरपराध हिंदूंना ती खरी श्रद्धांजली ठरली असती. पाकड्यांबरोबर क्रिकेटमध्ये हरणे हे पाप असेल तर पाकड्यांबरोबरचे सामने पाहणे हे महापातक आहे, किंबहुना गोवंशहत्येपेक्षा मोठे पातक आहे असे आम्ही समजतो. अर्थात क्रिकेटमध्ये धर्म आणि राजकारण आणू नये, असे सल्ले जे देतात त्यांनी संतापाने टीव्ही फोडणाऱयांच्याही भावना समजून घेतल्या पाहिजेत. मात्र ही देशभक्तीची भावना फक्त एवढ्यापुरती मर्यादित राहू नये. पाकिस्तानने आम्हाला क्रिकेटच्या मैदानात हरवल्याचा संताप येणाऱ्यांनो, कधी तरी कश्मीरात शहीद होणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थदेखील संतापून रस्त्यावर उतरा! देशभक्ती म्हणजे फक्त नोटाबंदीचे समर्थन नाही व टीव्ही फोडणे नाही!