अखेर धावांचं ग्रहण सुटलं, ‘रोहिट’नं ठोकलं १७ वं शतक

सामना ऑनलाईन । पोर्ट एलिजाबेथ

पोर्ट एलिजाबेथ येथे सुरू असलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानचा सलामीवीर रोहित शर्मामागचं धावांचं ग्रहण सुटलं आहे. पाचव्या सामन्यात रोहितनं दमदार फलंदाजी करत शतक झळकावलं आहे. एकदिवसीय कारकिर्दीतील रोहितचं हे १७ वं शतक आहे. रोहितनं १०७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या शतकासह हिंदुस्थानकडून सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये रोहित शर्माच्या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर टीका केली जात होती. कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यांमध्येही रोहितची कामगिरी खराब झाली होती. पहिल्या चार एकदिवसीय सामन्यात रोहितनं ५, ०, १५ आणि २० अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे रोहित फक्त पाटा खेळपट्टीवर फलंदाजी करू शकतो असा आरोप त्याच्यावर होत होता. मात्र पाचव्या सामन्यात दणदणीत शतक ठोकत रोहितनं त्याच्यावरील टिकाकारांना उत्तर दिलं आहे.