हिंदुस्थानचा विजयाने श्रीगणेशा, लंकेचा ९ विकेट्सने दणदणीत पराभव

सामना ऑनलाईन । दांबूला

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघामध्ये दांबूलाच्या मैदानावर पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानसमोर विजयासाठी २१७ धावांचे आव्हान ठेवले होते. लंकेने दिलेले माफक आव्हान हिंदुस्थानने २८.५ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. कसोटीनंतर एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानने विजयाने श्रीगणेशला केला आहे. या विजयासह हिंदुस्थानने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

लंकेने विजयासाठी दिलेल्या २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवनने २३ धावांची सलामी दिली. एक चोरटी धाव काढताना रोहित शर्मा ४ धावांवर धावबाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवनने लंकेच्या गोलंदाजांना आसमान दाखवले. धवन आणि कोहलीने शेवटपर्यत नाबाद राहात हिंदुस्थानला लिलया विजय मिळवून दिला. शिखर धवनने एकदिवसीय कारकिर्दीतील ११ वे शतक झळकावले. कोहलीनेही अर्धशतक झळकावत धवनला उत्तम साथ दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये १९६ धावांची भागिदारी झाली. शिखर धवनने ९० चेंडूत २० चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १३२ धावा केल्या, तर विराट कोहलीने ७० चेंडूत १० चौकार आणि १ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या.

त्याआधी हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लंकेच्या निरोशन डिकवेला आणि दानुष्का गुणतिलका यांनी १४ षटकांमध्ये ७४ धावांची सलामी दिली. सलामीची जोडी हिंदुस्थानसाठी डोकेदुखी ठरत असताना युजवेंद्र चहलने गुणतिलकाला बाद करत हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. गुणतिलकाने ४४ चेंडूत ३५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मेंडीस आणि डिकवेलामध्ये अर्धशतकीय भागिदारी झाली. अर्धशतक केल्यानंतर डिकवेला ६४ धावा करून बाद झाला. केदार जाधवने त्याला पायचीत केले. त्यापाठोपाठ अक्षर पटेलने मेंडीलचा त्रिफळा उडवत लंकेला तिसरा धक्का दिला.

मेंडीस बाद झाला तेव्हा लंकेची स्थिती ३ बाद १५० अशी होती. त्यानंतर मात्र भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीसमोर लंकेचा डाव कोसळला. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेल्याने लंकेचा डाव ४३.२ षटकांत २१६ धावांत गुंडाळण्यात हिंदुस्थानला यश आले. लंकेच्या शेवटच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अॅजेलो मॅथ्यूज ३६ धावा करून नाबाद राहिला. हिंदुस्थानकडून अक्षर पटेलने ३, बुमराह, चहल आणि जाधवने प्रत्येकी २ बळी मिळवले.

याआधी कसोटी मालिकेत हिंदुस्थानने यजमान संघाचा ३-० ने धुव्वा उडला होता. एकदिवसीय मालिकेतही लंकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी हिंदुस्थानच्या संघाने कंबर कसली आहे. पहिला सामना जिंकत एकदिवसीय मालिकेतही विजयाने श्रीगणेशा केलाआहे.