कुल’दीप’ चमकला! लंकेला फॉलोऑन, हिंदुस्थानला संधी

सामना ऑनलाईन । पालेकेले

गॉल कसोटी आणि कोलंबो कसोटीवर वर्चस्व गाजवल्यानंतर हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात पालेकेले येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीवर हिंदुस्थानने पकड मजबूत केली आहे. हिंदुस्थानने लंकेचा पहिला डाव १३५ धावांमध्ये गुंडाळत लंकेला फॉलोऑन दिला.

पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही लंकेची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर थरंगाला वेगवान गोलंदाज उमेश यादवने बोल्ड करत लंकेला पहिला धक्का दिला. दिवसअखेर लंकेने एक गडी गमावत १९ धावा केल्या आहेत. सलामीवीर करुनारत्ने १२ धावांवर, तर नाइट वॉचमन म्हणून आलेला पुष्पकुमारा शून्य धावांवर खेळत होते. श्रीलंकेचा संघ अजूनही ३३३ धावांनी पिछाडीवर असून सामन्याचे ३ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तिसरी कसोटी जिंकत लंकेला ‘क्लीन स्वीप’ देण्याची नामी संधी हिंदुस्थानला असणार आहे. हिंदुस्थानने लंकेचा पराभव केल्यास तब्बल ८५ वर्षांनी विदेशात सलग तीन कसोटी सामने जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी कोहली ब्रिगेडच्या नावावर होईल.

पहिल्या डावात शिखर धवन आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक शतकांच्या जोरावर हिंदुस्थानने ४८७ धावांचा डोंगर उभा केला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक पांड्याने जबरदस्त शतक झळकावले. पांड्याने ९६ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह आपले पहिले कसोटी शतक सजवले. त्याआधी पहिल्या दिवशी शिखर धवनने १२३ चेंडूत १७ चौकारांसह ११९ धावांची शतकी खेळी केली होती.

हिंदुस्थानचा पहिला डाव ४८७ धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर मैदानात उतरलेल्या लंकेचा पहिला डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सलामीवीर थरंगा आणि करुनारत्ने पुन्हा एकदा मोठी सलामी देण्यात अपयशी ठरले. दोन्ही सलामीवीरांना मोहम्मद शमीने एकामागोमाग एक असे बाद केले. त्यानंतर मेंडीसही धावबाद झाला. मॅथ्यूजला शुन्यावर पायचीत करत पांड्याने लंकेची ४ बाद ३८ अशी अवस्था केली. समोरील फलंदाज एकामागोमाग एक बाद होत असताना कर्णधार चांडीमलने एक बाजू लावून डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

चांडीमल आणि डिकवेलामध्ये अर्धशतकीय भागीदारी झाली. लंकेचा डाव सावरत आहे असे वाटत असतानाच डिकवेलाला यष्टीचीत करत कुलदीप यादवने डावातील पहिला बळी मिळवला. डिकवेलाने ३१ चेंडूत २९ धावा केल्या. डिकवेलानंतर परेरालाही कुलदीपने आल्यापावली माघारी पाठवले. कर्णधार चांडीमलने ४८ धावा केल्या. आर. अश्विनने त्याला बाद करत हिंदुस्थानच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर ठरावीक अंतराने बळी गमावल्याने लंकेचा संपूर्ण संघ १३५ धावांमध्ये गारद झाला.

कुल’दीप’चा चौकार

रविंद्र जाडेजावर आयसीसीने एका सामन्याची बंदी घातल्यामुळे कसोटी संघात स्थान मिळालेल्या कुलदीप यादवने संधीचा फायदा घेत बळींचा चौकार ठोकला. चांडीमल आणि डिकवेलाची जोडी हिंदुस्थानला डोकेदुखी होत असताना कुलदीपने डिकवेलाला बाद करत पहिला बळी मिळवला. त्यानंतर परेरा, पुष्पकुमारा आणि फर्नांडोला बाद करत बळींचा चौकार पूर्ण केला. कुलदीप यादवने पहिल्या डावात १३ षटकांची गोलंदाजी करताना ४० धावा देत चार बळी मिळवले. तर शमी आणि अश्विनने प्रत्येकी एक बळी मिळवला. उमेश यादवला एक बळी मिळाला.