हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास

सामना ऑनलाईन, मुंबई

मिताली राजच्या नेतृत्वात हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाचा १७६ धावांनी धुव्वा उडवला आणि त्यांच्या देशात पहिल्यांदाच वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाने १३५ धावांची संस्मरणीय खेळी करीत हिंदुस्थानच्या  मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला. आयसीसी महिला चॅम्पियननिशपसाठी दोन देशांमध्ये मालिका सुरु असून आता तिसरी वन डे लढत १० फेब्रुवारीला रंगेल. हिंदुस्थानचा संघ या मालिकेत २-०ने पुढे आहे.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या ३०३ धावांचा पाठलाग करणाऱया दक्षिण आफ्रिकेचा डाव ३०.५ षटकांत १२४ धावांमध्येच गडगडला. सलामीवीर लिझेली लीने तीन षटकार व सात चौकारांसह ७३ धावांची खेळी साकारली. इतर महिला क्रिकेटपटूंना हिंदुस्थानी गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावता आले नाही. पूनम यादवने २४ धावा देत चार फलंदाज बाद केले. झुलन गोस्वामीने २०० बळींचा टप्पा पूर्ण केला.

फलंदाजांचा धमाका

दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पूनम राऊत (२०) व स्मृती मानधना (१३५) यांनी  ५६ धावांची सलामी देत हिंदुस्थानला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार मिताली राजने २० धावा केल्या. पण तिला मोठी खेळी करता आली नाही. स्मृती मानधना व हरमनप्रीत कौर यांनी तिसऱया विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी करताना दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. स्मृती मानधनाने एक षटकार व १४ चौकार चोपून काढले. हरमनप्रीत कौरने नाबाद ५५ धावांची, तर वेदा कृष्णमूर्तीने नाबाद ५१ धावांची खेळी केली.