कांगारूंची आजपासून सराव परीक्षा

मुंबई – हिंदुस्थानच्या बहुचर्चित दौऱयावर आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा उद्यापासून तीनदिवसीय सराव सामना सुरू होत आहे. हार्दिक पांडय़ाच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानचा ‘अ’ संघ बलाढय़ कांगारूंना कडवी झुंज देण्यासाठी सज्ज झालाय. त्यामुळे विराट कोहलीच्या सेनेशी भिडण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची सराव परीक्षेतही ‘कसोटी’ लागणार आहे.

हार्दिक पांडय़ाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली छाप सोडलेली आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यांच्या निमित्ताने त्याला आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी असेल. जोश हेजलवूड व मिशेल स्टार्क या प्रतिभावान गोलंदाजांचा हिंदुस्थान ‘अ’ संघाने समर्थपणे सामना केल्यास ‘टीम इंडिया’शी भिडण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. सलामीचा फलंदाज प्रियांक पांचालने बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात शतकी खेळी केली होती. त्याच्या फलंदाजीवरही राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष असेल. याचबरोबर रिषभ पंत आणि ईशान किशन यांच्या कामगिरीकडेही सर्वांच्या नजरा असतील. मुंबईचे श्रेयस अय्यर व अखिल हर्वेडकरही फॉर्ममध्ये आहेत. यातील एक फलंदाज प्रियांक पांचाळच्या साथीने डावाची सुरुवात करू शकतो. अय्यरने तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करताना १३००हून अधिक धावा केल्या आहेत. मधल्या फळीत महाराष्ट्राचा अंकित बावणे व तामीळनाडूचा बाबा अपराजित यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी असेल. ऑस्ट्रेलिया या सराव सामन्यात सर्वोत्तम संघ उतरविण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान ‘अ’ संघात अशोक दिंडा, हार्दिक पांडय़ा, कुलदीप यादव, शाहबाज नदीम असे दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यामुळे हा सराव सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

उभय संघ – ऑस्ट्रेलिया – स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अशोक अगार, जॅक्सन बर्ड, पीटर हॅण्डस्कांब, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा, नाथन लियोन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीफन ओकीफे, मॅथ्यू रेनशा, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, मॅथ्यू वेड.
हिंदुस्थान ‘अ’ – हार्दिक पांडय़ा (कर्णधार), अखिल हेरवाडकर, प्रियांक पांचाल, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, रिषभ पंत, ईशान किशन, शाहबाज नदीम, कृष्णप्पा गोथमस कुलदीप यादव, नवदीप सैनी, अशोक डिंडा, मोहम्मद सिराज, राहुल सिंह, बाबा इंद्रजित.