मोदींचे गगनगान! 2022 पर्यंत अंतराळात तिरंगा फडकवणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

2022 पर्यंत हिंदुस्थानी ‘गगनयाना’तून अंतराळात जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी 82 मिनिटांचे भाषण केले. गेल्या साडेचार वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेताना मोदींनी ‘गरिबी’वर भर दिला, पण ‘रोजगारा’चा मात्र एकदाच उल्लेख केला.

पंतप्रधानांनी सरकारची कामगिरी सांगण्यासाठी 40 मिनिटे घेतली. त्यात त्यांनी ‘जीएसटी’पासून स्वयंपाकाचा गॅस, गावातील वीजपुरवठा, शौचालय आणि बेनामी संपत्तीचा हवाला देत नाव न घेता तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका केली. 2013 पर्यंत सरकारी योजनांचा जो वेग होता तो 2014 नंतरही कायम राहिला असता तर ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी सरकारला कित्येक दशके लागली असती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

तीन घोषणा
– 2022 मध्ये हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाचा एक नागरिक अंतराळ जाईल. त्याच्या हातात तिरंगा असेल. यासोबतच मानवाला अंतराळात पाठवणारा हिंदुस्थान चौथा देश ठरेल.
-10 कोटी कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतची उपचाराची सुविधा देणारी ‘आयुष्यमान भारत’ योजना सुरू करणार. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 25 सप्टेंबरपासून प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान सुरू करण्यात येईल.
-सैन्यदलात महिलांना स्थायी कमीशन देण्यात येणार. शॉर्ट सर्व्हिस कमिशनमार्फत नियुक्त महिला अधिकाऱयांना पुरुष अधिकाऱयांच्या बरोबरीनेच स्थायी कमिशन देणार.

पंतप्रधानांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे
– ना गाली से, ना गोली से, सिर्फ ‘गले मिलने’सेही कश्मीर प्रश्न सुटू शकेल.
– निद्रिस्त हत्ती आता जागा झाला आहे आणि तो पळू लागला आहे. हिंदुस्थान आज मल्टी ट्रिलियन डॉलर्स गुंतवणुकीचा देश बनला आहे.
– सरकारी योजनांमध्ये तब्बल 90 हजार कोटींची बचत झाली आहे. तब्बल सहा कोटी बोगस लाभार्थ्यांना बाजूला केले आहे.
– गेल्या दोन वर्षांत 5 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.
– मुद्रा योजनेच्या माध्यमातून चार कोटी लाभधारकांना लहान उद्योगासाठी 13 कोटी रुपये देण्यात आले.
– शेतकऱयांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार.
– मुस्लिम महिलांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत राहू.

82 मिनिटांचे भाषण
गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 57 मिनिटांत भाषण आटोपते घेतले होते. यंदा मात्र त्यांनी 82 मिनिटे भाषण केले. 2016 मध्ये त्यांचे भाषण तब्बल 96 मिनिटे चालले. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून 72 मिनिटांचे भाषण केले होते. 2015 पर्यंत हा विक्रम अबाधित होता. मोदींनी 2014 मध्ये 65 मिनिटे आणि 2015 मध्ये 86 मिनिटे भाषण केले. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान या नात्याने सर्वाधिक 10 भाषणे केली, पण ती कधीच 50 मिनिटांपेक्षा अधिक नव्हती.

39 वेळा ‘गरीब’, ‘रोजगार’ फक्त एकदाच!
मोदींच्या भाषणाची काही वैशिष्टय़ेही आहेत. म्हणजे त्यांनी कश्मीरपासून ‘स्वच्छ भारत’पर्यंत सर्वांचा लेखाजोखा मांडला, पण 82 मिनिटांच्या भाषणात त्यांचा भर ‘गरीब’वरच होता. त्यांनी भाषणात ‘गरीब’ शब्द 39 वेळा वापरला. मात्र ‘रोजगार’ हा शब्द एकदाच वापरला. ‘किसान’ (शेतकरी) 14 वेळा, ‘गाव’ 22 वेळा तर ‘कृषी’ शब्द 11 वेळा वापरून मोदींनी भाषण केले.

‘सच्चे दिन’ का इंतजार है; काँग्रेसचा मोदींवर हल्ला
स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरच्या आपल्या अखेरच्या भाषणात तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही तरे खरे बोलतील ही अपेक्षाही फोल ठरली, अशी तोफ काँग्रेसने मोदी यांच्या भाषणावर डागली. त्यांनी सांगितलेले ‘अच्छे दिन’ तर आलेच नाहीत; पण देशाला आता ‘सच्चे दिन’ची प्रतीक्षा असून मोदी सत्तेवरून पायउतार झाल्याशिवाय सच्चे दिन येणार नाहीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. मोदी यांनी राफेल, व्यापम, अर्थव्यवस्था, देशातील द्वेषाचे वातावरण, शेतकऱयांची दुर्दशा, छत्तीसगडचा पीडीएस घोटाळा यावर मौनच पाळले, असे ते म्हणाले.

लाल किल्ल्यावरूनही ‘इलेक्शन स्पीच’- मायावती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून केलेले भाषण निव्वळ ‘इलेक्शन स्पीच’ होते. रॅली आणि प्रचार सभांमधून त्यांची जी भाषणबाजी चालते त्यापेक्षा वेगळे काही त्यांनी स्वातंत्र्यदिनीही केले नाही, अशी टीका बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केली.

राष्ट्रगीताचा समारोप होताना शाळकरी मुलगी बेशुद्ध होऊन कोसळली
पंतप्रधानांच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर राष्ट्रगीताचा समारोप होत असताना इयत्ता सातवीची एक मुलगी बेशुद्ध होऊन खाली कोसळण्याची घटना घडली. सकाळची वेळ असूनही हवेत गरमी होती. आर्द्रतेचे प्रमाण जास्त होते. त्यातच या मुलीस पाणी न मिळाल्याने डिहायड्रेशन होऊन फिझा नामक विद्यार्थिनी खाली कोसळली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. येथील सर्वोदय कन्या शाळेची ही विद्यार्थिनी आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील शाळांना पहाटेच सकाळी 6.30 पूर्वी लाल किल्ल्यावर बोलवून घेतले होते, पण त्यांच्या पिण्याच्या पाण्याची आणि नाष्टय़ाची पुरेशी व्यवस्था येथे नव्हती हे या घटनेने समोर आले आहे. आम्हाला पाण्याची एक बाटली मिळविण्यासाठी झगडावे लागले, असे एका शाळेतील मुलीने सांगितले.

मोदींचे भाषण सुरू असताना छायाचित्रकार कोसळला
वाढलेल्या तापमानाचा त्रास एका छायाचित्रकारालाही झाला. पंतप्रधान मोदी हे देशवासीयांना संबोधित असतानाच हा छायाचित्रकार बेशुद्ध होऊन खाली कोसळला. सुरक्षा रक्षकांनी त्याला त्वरित रुग्णालयात हलविले.

लाल किल्ल्यावर कचऱ्याचे साम्राज्य
स्वच्छ भारत अभियान हा सरकारचा नारा आहे. पण याच्या उलट चित्र लाल किल्ल्यावर आज पाहावयास मिळाले. पंतप्रधानांच्या भाषणानंतर लाल किल्ल्याच्या समोरच्या मैदानात रिकाम्या पिण्याच्या बाटल्यांचा खच जागोजागी पडला होता. केळय़ांच्या सालींचे ढीग ठिकठिकाणी तयार झाले होते. इतर खाद्यपदार्थांच्या प्लॅस्टिकचे पॅकिंग इकडेतिकडे फेकून दिले होते.
कचरा टाकण्यासाठी काही कॅरेट ठेवले होते. पण हे कॅरेट भरल्याने उपस्थित नागरिक आणि शाळकरी मुलांनी केळय़ाची सालटी, मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्या, अन्नपदार्थांचे पॅकिंग इतस्ततः फेकून दिले. यामुळे लाल किल्ल्यावर आज देशाच्या स्वातंत्र्यदिनी कचऱयाचे साम्राज्य पसरल्याचे दिसत होते.

अमित शहांच्या हातूनतिरंगाघरंगळला

राजधानीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मात्र त्यांनी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी दोरी हातात घेताच ‘तिरंगा’ घरंगळत खाली आला. तेवढय़ात शहा यांनी वेळीच दुसरी दोरी खेचली आणि झेंडा पुन्हा वर नेला. त्यानंतर राष्ट्रध्वज फडकल्यावर उपस्थितांचा जीव भांडय़ात पडला.

अमित शहा यांच्या हातून ‘तिरंगा घरंगळत खाली आल्याच्या घटनेवरून काँग्रेसने आणि ‘आप’चे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर लागलीच निशाणा साधला.

काँग्रेस, आपचा निशाणा

50 वर्षे तिरंग्याचा तिरस्कार केला नसता तर कदाचित राष्ट्रध्वजाच्या अवमानाची आजची घटना घडली नसती, असे काँग्रेसने म्हटले आहे. दुसऱयांना ‘देशभक्ती’ची प्रमाणपत्रे वाटणाऱयांनी राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याबाबतचा शिष्टाचार आणि पद्धत शिकण्याची गरज आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमित शहा यांच्यावर अतिशय तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. तिरंग्याने अमित शहा यांच्या हस्ते फडकणे पसंत केले नाही हेच खरे. मी दुःखी आहे, असेच भारतमातेने त्या घटनेतून जणू सांगितले आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

 गडचिरोलीत माओवाद्यांचा काळा स्वातंत्र्य दिन

देशभरात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष सुरू असतानाच गडचिरोलीमध्ये मात्र माओवाद्यांनी काळा स्वातंत्र्यदिन साजरा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भामरागड तालुक्यातील अरेवाडा गावात सकाळी ग्रामस्थ ध्वजारोहण करण्यासाठी पंचायती समिती कार्यालयाकडे गेले असता त्यांना कार्यालयावर काळा झेंडा फडकत असलेला दिसला. गडचिरोलीपासून सुमारे 180 किमीवर हे गाव आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गावांपैकी हे एक गाव आहे. गाव खूप दूर असल्याने तेथे पोहचण्यास उशीर झाल्याचे  भामरागडचे पोलीस निरीक्षक सुरेश मेदणी यांनी सांगितले.