हिंदुस्थानविरोधी पोटशूळ!

>>जयेश राणे<<

पॅरिस करारासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप हिंदुस्थानने फेटाळून लावला आहे. आरोप फेटाळून लावण्यास थोडा उशीर झाला. यावर ‘हिंदुस्थानने अमेरिकेला काय करावे ते सांगण्याची गरज नाही’, अशी दर्पोक्ती अमेरिकेने केली आहे. ‘‘विकसित देशांकडून अब्जावधी डॉलर मिळावेत या हेतूने हिंदुस्थानने पॅरिस करारावर स्वाक्षरी केली आहे,’’ असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. हा आरोप फेटाळताना केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘‘करारावर स्वाक्षरी करण्यामागे कुणाचाही दबाव वा कुठलेही आमिष नाही. पर्यावरण रक्षणाशी हिंदुस्थान पाच हजार वर्षांपासून कटिबद्ध आहे. आम्ही निसर्गाची पूजा करतो. त्यासाठीच हिंदुस्थानने पॅरिस करारावर स्वाक्षरी केली आहे.’’

देशाला डिवचणाऱया कोणत्याही राष्ट्रास तत्काळ चोख उत्तर दिले पाहिजे. मग ते उत्तर शाब्दिक, प्रत्यक्ष आक्रमण करण्याच्या स्वरूपातीलही असू शकते. उत्तर तत्काळ न देणे धोरण लकव्याचे द्योतक असल्याची शंका येते. एका देशाचा राष्ट्राध्यक्ष जागतिक व्यासपीठावरून हिंदुस्थानच्या अब्रूचे धिंडवडे निघेल असे वक्तव्य करून समस्त हिंदुस्थानींचा अवमान करतो. याचा साधा निषेधही देशातून कोणी करत नाही. हेच का आपले राष्ट्रप्रेम? तोंडदेखला मित्र असणारा तो देश प्रत्यक्षात हिंदुस्थानच्या शत्रूला सर्वतोपरी भरघोस सहाय्य करत असतो. तरीही हिंदुस्थान मूग गिळून शांतच बसतो. त्याहीपुढे जाऊन देशाविषयी निंदाजनक वक्तव्य करतो. तरीही हिंदुस्थान म्हणतो, ‘‘अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली असली तरी त्याचा हिंदुस्थान-अमेरिका संबंधांवर काहीही प्रतिकूल परिणाम होणार नाही. बराक ओबामा यांच्या कारकीर्दीत उभय देशांमधील संबंध जसे मैत्रीचे होते तसेच ते यापुढेही कायम राहतील.’’ अमेरिकी आस्थापनांची हिंदुस्थानातील गुंतवणूक, बहुसंख्येने अमेरिकेत चाकरी करत असलेले हिंदुस्थानी या दोन मुख्य गोष्टींमुळे हिंदुस्थान अमेरिकेविषयी रोखठोक बोलण्यास धजावत नाही. हिंदुस्थानकडून होत असलेली ही गुलामगिरी नव्हे का? या प्रश्नाचे उत्तर शोधल्यानंतरच हिंदुस्थान अमेरिकेची कानउघाडणी करू शकतो अशी दयनीय स्थिती तत्कालीन नेत्यांनी करून ठेवल्याने निंदाजनक वक्तव्य ऐकण्याची वेळ आली. दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकेने व्हिसा धोरणाबाबत अवलंबलेला कठोरपणा, स्वदेशीचा स्वीकार करण्यासाठी करण्यात आलेला प्रचार आणि त्यास अमेरिकेच्या कानाकोपऱयातून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद. या गुर्मीतून हिंदुस्थानविषयी निर्माण झालेली तेढ ट्रम्प यांच्या त्या धिक्कारजनक वक्तव्यामागे असू शकते. हिंदुस्थानबद्दल घुसमटत असलेला राग व्यक्त करण्यासाठी संधी मिळताच त्या देशाच्या अध्यक्षांनी ती संधी साधली. यावरून सतर्क होत अमेरिकेचे भविष्यातील हिंदुस्थानविषयक धोरण कसे असेल याचा अंदाज घेतला पाहिजे. अशा देशाकडून आपल्या देशाविषयी केलेली कोणतीही कृती, वक्तव्यांचा यापुढे अधिक गंभीरपणे विचार झाला पाहिजे. कारण अमेरिकेच्या हिंदुस्थानविषयक विचारसरणीत नकारात्मक दिशेने वाटचाल होत असल्याचे हे संकेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी अमेरिका दौरा कसा असणार आहे, याकडे आता दोन्ही देशांचे विशेष लक्ष असणार आहे.

१९० देशांचा सहभाग असलेला २०१५ सालचा पॅरिस करार म्हणजे पर्यावरणाविषयीचा महत्त्वाचा करार आहे. तो धुडकावून लावत त्यातून पळ काढणाऱया अमेरिकेस ‘पर्यावरणविरोधी देश’ असा शिक्का मारून त्यास बहिष्कृत केले पाहिजे. हिंदुस्थानने पर्यावरण हित लक्षात घेऊन त्या करारावर स्वाक्षरी केली. जळीस्थळी स्वार्थ पाहणारा अमेरिकेसारखा देश महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी तरी कशी करणार? कारण त्यांना विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थ आदींद्वारे जगावर असलेला आपला दबदबा जो कायम ठेवायचा आहे. चार भिंतींच्या प्रयोगशाळांमध्ये तंत्रज्ञाननिष्ठ प्रगती करणाऱयांना निसर्ग कधीच कळला नाही आणि कळणारही नाही. म्हणूनच तर सतत भयंकर चक्रीवादळाचे तडाखे त्या देशास बसत असतात. निसर्गाचे रक्षण करतील तेच टिकतील, बाकीचे त्याच्या तडाख्याने नेस्तनाबूत होतील असा सुस्पष्ट संदेश यातून मिळतो. निसर्गाच्या शत्रूंना तो संदेश कळण्यासाठी कोणत्याही यंत्राची निर्मिती करण्याची आवश्यकता नाही. निसर्ग भीषण रौद्रावताराने आपला संदेश अशांपर्यंत नक्की पोचवेल, पण तेव्हा मात्र वेळ निघून गेल्याने  ‘तेलही गेले तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’ अशी स्वतःला महासत्ता म्हणवणाऱया देशाची भिकेकंगाल स्थिती होईल अशी चिन्हे दिसतात. यास ‘विनाशकाले विपरीतबुद्धी’ असे म्हणता येईल. अमेरिकेच्या निमित्ताने ‘अतिशहाणा त्याचा बैल रिकामा’ हे वाक्य प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी तीव्र अहंकारी, उन्मादी, आसुरी वृत्तीच्या अफझलखानाचा कोथळा काढला होता हा इतिहास आहे. दुसऱयाला पाण्यात पाहणारे स्वतःच स्वतःचा विनाश ओढवून घेत असतात. त्यांची सुभेदारीही फार काळ टिकत नाही. अति तिथे माती या तत्त्वावर चालणारा निसर्गाचा नियम अमेरिकेने लक्षात ठेवावा. आज जरी हिंदुस्थान अमेरिकेसमोर वैज्ञानिक प्रगतीच्या तुलनेत छोटा असला तरी येथील कणाकणांत जी आध्यात्मिक शक्ती आहे ती जगामध्ये कोणत्याच देशाकडे नाही. याच शक्तीच्या बळावर हिंदुस्थान विश्वगुरू बनणार यात तिळमात्रही शंका नाही. जगातील अनेक देश या आध्यात्मिक शक्तीचा जिज्ञासेने अभ्यास करत आहेत.