तीन सामने जिंकूनही विराटसेनेला आज ‘करो या मरो’

सामना ऑनलाईन । मुंबई
ऑस्ट्रेलियाविरूद्ध सलग तीन सामन्यात दमदार विजय मिळवून हिंदुस्थानी संघाने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिला नंबर पटकवला. मात्र तब्बल तीन वर्षांनंतर मिळालेलं अव्वल स्थान कायम राखण्यासाठी हिंदुस्थानी संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्धचा आजचा सामनाही जिंकावा लागणार आहे.
कर्णधार विराटच्या नेतृत्वात खेळणारा हिंदुस्थानचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराट सेनेनं दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. सध्या हिंदुस्थानी संघाकडे १२० अंक आहेत. तर दक्षिण आफ्रिका संघ ११९ अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आपलं अव्वल स्थान टिकवण्यासाठी हिंदुस्थानी संघाला आजचा सामना जिंकून अंकांमधील फरक वाढवणं गरजेचं आहे.
दरम्यान, या आधी नोव्हेंबर २०१४ मध्ये हिंदुस्थानचा संघ नंबर वन ठरला होता.
आयसीसी वनडे रँकिंगमधील टॉप-८ संघ
हिंदुस्थान – १२०
द. अफ्रीका – ११९
ऑस्ट्रेलिया – ११४
इंग्लंड – ११३
न्यूझीलंड – १११
पाकिस्तान – ९५
बांगलादेश – ९४
श्रीलंका – ८६