विराटसेनेने इतिहास घडवला; ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ‘ऐतिहासिक’ विजयाने

फोटो - बीसीसीआय

सामना ऑनलाईन । मेलबर्न

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट ऐतिहासिक विजयाने केला आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत विराटसेनेने इतिहास घडवला.

यजमान कांगारुंना कसोटी आणि एक दिवसीय मालिकेत पराभवाचे पाणी पाजण्याची कामगिरी टीम इंडियाने केली आहे. तसेच टी-20 मालिका बरोबरीत सुटल्याने कांगारुंना घरच्या मैदानात या प्रदीर्घ दौऱ्यात मालिका विजयापासून वंचित रहावे लागले.

चहलच्या षटकाराने शास्त्री, मुश्ताकचा विक्रम मोडीत, आगरकरशी बरोबरी
धोनीचा धमाका..! सलग तीन अर्धशतकं, 150 च्या सरासरीने धावा
Photo : वन डेमध्ये ‘षटकार’ लगावणारे टीम इंडियाचे गोलंदाज

मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एक दिवसीय सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने यजमान कांगारुंचा 7 विकेट्सने पराभव केला. धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 तर केदार जाधवने 57 चेंडूत नाबाद 61 धावांची खेळी केली. त्यापूर्वी विराटने 46 धावा करत संकटात सापडलेला डाव धोनीसोबत मिळून सांभाळला. परंतु अर्धशतक झळकावण्यात त्याला अपयश आले.

त्याआधी नाणेफेक गमावल्याने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी विराटने दिली. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज युझवेंद्र चहलच्या फिरकीत अकडले आणि त्यांचा डाव 230 धावात आटोपला. चहलने 52 धावांत 6 बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून हँडस्कोम्बने सर्वाधिक 58 धावा केल्या.

धोनी मालिकावीर तर चहल सामनावीर
ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या चहलने याचे सोने करत सहा बळी घेतले. या सोनेरी कामगिरीमुळे त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली तर सलग तीन अर्धशतक ठोकणाऱ्या धोनीची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. धोनीने तीन अर्धशतकांसह (51, नाबाद 55 आणि नाबाद 87) एकूण 193 धावा चोपल्या.

कसोटीनंतर एक दिवसीय मालिकेत विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकूण देणारा विराट पहिलाच कर्णधार ठरला. तसेच कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाने एक दिवसीय मालिकेवरही वर्चस्व गाजवले आणि मालिका 2-1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियात कसोटी आणि एक दिवसीय मालिका जिंकत विराट सेनेने ऐतिहासिक कामगिरी केली.