धवनचा धमाका; हिंदुस्थानकडून बांगलादेशचा सफाया

सामना ऑनलाईन । कोलंबो

बांगलादेशविरुद्ध टी-२० मध्ये एकदाही पराभूत न होण्याची परंपरा हिंदुस्थानने कायम राखलीय. श्रीलंकेत सुरु असलेल्या निदास करंडक टी-२० मधील दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थानने बांगलादेशचा ६ विकेट्सनं सहज पराभव केला. फॉर्मात असलेल्या शिखर धवनचे अर्धशतक हे या विजयाचे मुख्य वैशिष्ट्य होते.

शिखर धवनने सर्वाधिक सर्वाधिक ५५ धावा केल्या. धवनचे हे टी-२० मधील सहावे अर्धशतक आहे. त्याला सुरेश रैना ( २८) आणि मनिष पांडे ( नाबाद २७) यांनी उत्तम साथ दिली. कर्णधार रोहित शर्मा मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. तो १७ धावांवर बाद झाला. युवा फलंदाज ऋषभ पंतनेही पुन्हा निराशा केली. पंतला केवळ ७ धावा करता आल्या.

पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानं या सामन्यात हिंदुस्थानवर दडपण होते. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली.  हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत बांग्ला फलंदाजांना मनमुराद फटकेबाजी करु दिली नाही.

आयपीएलमधील ”मिलियन डॉलर बेबी’ जयदेव उनाडकट हा गुरुवारी सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. ३८ धावात ३ विकेट्स घेतल्या. नवोदीत विजय शंकरने २ विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली.