हॉकी चौरंगी मालिका, हिंदुस्थानने उडवला जपानचा धुव्वा

सामना ऑनलाईन । तौरांगा

हिंदुस्थानी संघाचा हुकमी ड्रगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह व त्याच्या साथीला नवोदीत विवेक प्रसाद यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर हिंदुस्थानाने चौरंगी हॉकी मालिकेत विजयी सलामी दिली. न्यूझीलंड येथे सुरू असलेल्या या मालिकेत हिंदुस्थानने जपानवर ६-० असा एकतर्फी विजय मिळवला.

सामन्याच्या सातव्या मिनिटाला रुपिंदरपाल सिंहने गोल करत संघाचे खाते उघडले. सामन्यात सातव्या मिनिटाला हिंदुस्थानला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, मात्र हरमनप्रीतने मारलेला फटका चुकीच्या पद्धतीने अडकल्यामुळे हिंदुस्थानला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला. अनुभवी रुपिंदपाल सिंहने यावेळी मिळालेल्या संधीचे सोने करत हिंदुस्थानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर विवेक प्रसाद (१२ आणि २८ व्या मिनीटाला), दिलप्रीत सिंह (३५ आणि ४५ व्या मिनिटाला), हरमनप्रीत सिंह (४१ व्या मिनिट) यांनी गोल करत जपानचा बचाव उद्ध्वस्त केला.

यानंतर नवोदित विवेक प्रसाद, दलप्रीत सिंह यांनी निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवत हिंदुस्थानची आघाडी कायम राखली. या सामन्यात जपानी खेळाडूंचा हिंदुस्थानी खेळाडूंच्या झंझावातापुढे निभावच लागला नाही. जपानी खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली, मात्र संधीचा फायदा त्यांना उचलता आला नाही. आता हिंदुस्थानसमोर पुढच्या लढतीत बेल्जियमचे आव्हान असेल.