हिंदुस्थानचा शानदार मालिका विजय

सामना ऑनलाईन । थिरुवनंतपुरम

भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चाहल व कुलदीप यादव यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने येथे झालेल्या अखेरच्या ट्वेण्टी-२० लढतीत पाहुण्या न्यूझीलंडला ६ धावांनी हरवले आणि तीन सामन्यांची ट्वेण्टी-२० मालिका २-१ अशा फरकाने खिशात घातली. पावसाच्या व्यत्ययामुळे उभय देशांमध्ये प्रत्येकी आठ षटकांचा सामना खेळवण्यात आला.

टीम इंडियाकडून मिळालेल्या ६८ धावांचा पाठलाग करणाऱया न्यूझीलंडने ६ बाद ६१ धावा अशी मजल मारली. जसप्रीत बुमराह (९ धावांत दोन बळी) व भुवनेश्वरकुमार (१८ धावांत १ बळी) या वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करीत न्यूझीलंडच्या फलंदाजांना बांधून ठेवले. किवींकडून कोलिन ग्रॅण्डहोमने नाबाद १७ धावा केल्या.

दरम्यान, याआधी प्रथम फलंदाजी करणाऱया टीम इंडियाने आठ षटकांत ५ बाद ६७ धावा केल्या. विराट कोहलीने १३ धावा, मनीष पांडेने १७ धावा आणि हार्दिक पांडय़ाने नाबाद १४ धावा करीत हिंदुस्थानच्या धावसंख्येत मोलाची भर टाकली.