सराव सामन्यात कांगारुंनी मारली बाजी

सामना ऑनलाईन । चेन्नई

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवार (१७ सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. त्याआधी झालेल्या एकमेव सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अध्यक्षीय संघाचा १०३ धावांनी पराभव केला आहे.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मार्क स्टोईनिस (७६), ट्रॅव्हिस हेड (६५) आणि कर्णधार स्विव्हन स्मिथ (५५) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकात ७ विकेट्स गमावत ३४७ धावांचा डोंगर उभा केला. अध्यक्षीय संघाकडून कुशांग पटेल आणि वाशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २ बळी मिळवले.

विजयासाठी ३४८ धावांचा पाठलाग करताना अध्यक्षीय संघाची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या १० असताना राहुल त्रिपाठी ७ धावा करून बाद झाला. मात्र श्रीवल्स गोस्वामी आणि मयंक अग्रवाल यांनी ७९ धावा करत संघाच्या विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या. मात्र मधल्या फळीने निराशा केल्याने अध्यक्षीय संघाची अवस्था ८ बाद १५६ अशी झाली होती. त्यानंतर अक्षय कर्नेवार (४०) आणि कुशांग पटेल (४१) यांनी प्रतिकार केल्याने हिंदुस्थानला पराभवातील अंतर कमी करता आले.