चीनच्या मदतीशिवाय मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करता येऊ शकते

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत चीनने पुन्हा एकदा आडमुठी भूमिका घेतली आहे. मात्र चीनच्या मदतीशिवाय देखील हिंदुस्थान मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करू शकतो. त्यासाठी हिंदुस्थानकडे आणखी एक मार्ग आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या चाप्टर 27 नुसार जर सुरक्षा परिषदेतील 15 पैकी 9 सदस्य जर हिंदुस्थानच्या मागणीला पाठिंबा देतील व मसूद अजहर विरोधात मत देतील तर हिंदुस्थानचा मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा होईल.

हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्र संघाच्या सँक्शन कमिटीकडे मसूद अजहरला आंतराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्याचा प्रस्ताव सोपवला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या समितीकडे हा प्रस्ताव रखडलेला आहे. मात्र काही तांत्रिक बाबी दाखवत चीनने त्यावर स्थगिती आणली आहे. सँक्शन कमिटीपेक्षा वर संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषद आहे. त्या परिषदेकडे आता हा प्रस्ताव दिला जाऊ शकतो. जर या परिषदेने मतदानाचा मार्ग निवडला. तर त्या परिषदेतील 15 देशांपैकी 9 देशांनी जर मसूद अजहर विरोधात मत दिले तर हिंदुस्थानची मागणी मंजूर केली जाऊ शकते.

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चीनने अजहरविरोधातील पुरावे हिंदुस्थानकडे मागितले आहेत. हे पुरावे योग्य वाटले तरच आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याला पाठिंबा देऊ, अशी आडमुठी भूमिका चीनने घेतली आहे. त्यामुळे काही झाले तरी चीन मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आडकाठी आणत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.