SAFF : पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत हिंदुस्थान फायनलमध्ये दाखल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चँपियनशिप (SAFF)च्या उपांत्यफेरीचा सामना हिंदुस्थान आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या फुटबॉल सामन्यात 3-1 असा दणदणीत विजय मिळवत हिंदुस्थानने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हिंदुस्थानकडून महावीर सिंगने 2, तर सुमीत पासीने एक गोल केला.

दोन चिर प्रतिद्वंद्वी संघातील सामना पाहण्यासाठी मैदानावर चांगली गर्दी झाली होती. सामन्याच्या सुरुवातीपासून हिंदुस्थानने पाकिस्तानवर दबाव टाकला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या हाफमध्ये 48 व्या मिनिटाला हिंदुस्थानकडून महावीर सिंगने पहिला गोल केला. त्यानंतर आणखी एक गोल तर ही आघाडी 2-0 अशी वाढवली. त्यानंतर सुमीत पासीने तिसरा गोल करत हिंदुस्थानसाठी विजयाचे द्वार उघडले. सामना संपण्यास काही अवधी बाकी असताना पाकिस्तानकडून हसन बशिरने एकमात्र गोल केला. अखेर हिंदुस्थानने सामना 3-1 असा जिंकत फायनल गाठली.

दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चँपियनशिपमध्ये आजपर्यंत हिंदुस्थानला पराभव स्वीकारावा लागलेला नाही. आपला हाच विक्रम हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्धही कायम राखला. हिंदुस्थानने आतापर्यंत सात वेळा दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चँपियनशिपवर नाव कोरले आहे.