हिंदुस्थानात स्त्री-पुरुष समानता फक्त नावापुरती

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानात आता स्त्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्या कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. असे बोलले जाते. पण,प्रत्यक्षात आपल्या देशात स्त्रीयांना अजूनही दुय्यमच वागणूक दिली जात असल्याचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने केलेल्या सर्व्हेक्षण अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे आपल्या देशात स्त्री-पुरुष समानता ही फक्त नावापुरती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करून स्त्रीयांनी आपल्यातील धमक दाखवली आणि सर्व क्षेत्रांत आपला ठसा उमटवला खरा. परंतु समाज म्हणून स्त्रीयांना हिंदुस्थानात अजूनही समानतेची वागणूक मिळत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. त्यामुळे आपल्या देशात स्त्रीया पुरुषांपेक्षा कमी नाहीत असे आपण अभिमानाने सांगू शकतो का, यावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

महिलांना कर्तृत्त्व सिद्ध करण्यासाठी मिळणाऱया संधीत हिंदुस्थान १३९व्या तर महिलांचे आरोग्य आणि सोयीसुविधांमध्ये १४१ व्या क्रमांकावर आहे.

स्त्री-पुरुष समानतेमधील दरी भरून निघण्यासाठी आणखी १०० वर्षे लागणार. याआधी हा कालावधी ८३ वर्षे होता.

असे केले सर्व्हेक्षण

पुरुषांच्या तुलनेत स्त्रीयांना कामाच्या ठिकाणी मिळणारे वेतन, अर्थव्यवस्थेतील महिलांचे योगदान, राजकीय प्रतिनिधित्व, आरोग्य आणि शिक्षण या मुद्दय़ांना अनुसरून सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेच्या निष्कर्षानुसार स्त्री-पुरुष समानता निर्देशांकात हिंदुस्थान जगात आता १०८ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे तर जागतिक क्रमवारीत हिंदुस्थानची तब्बल २१ अंकांनी घसरण झाली आहे.