देशात टॅलेंटची कमतरता नाही, ते जोपासायला हवे! माजी धावपटू पी. टी. उषाचे आवाहन

सामना प्रतिनिधी । मीरत

हिंदुस्थानात क्रीडानैपुण्य आणि टॅलेंटची कमतरता मुळीच नाही. पण देशाच्या गावागावात जाऊन शोधण्यासाठी आणि त्याची जोपासना होण्यासाठी सर्वच थरावर प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन हिंदुस्थानला आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांत पदके मिळवून देणारी माजी धावपटू पी. टी. उषा हिने केले आहे. उत्तर प्रदेशातील मीरतच्या एका शाळेत ‘महिला सशक्तीकरण’ या विषयावर बोलताना उषाने हे आवाहन सरकार, क्रीडा संघटना आणि क्रीडापटूंना केले.

उत्तर प्रदेशात राज्य ऍथलेटिक्स महासंघ खरेच कौतुकास्पद काम करीत आहे असे सांगून उषा म्हणाली, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यात हायटेक क्रीडा सुविधा वाढवा असे साकडे घालणार आहे. आपल्याला देशात छोट्या वयातच खेळाडूंचे गन, त्यांची प्रतिभा ओळखून क्रीडा क्षेत्राशी त्यांचे नाते जोडायला हवे. आपल्याला क्रीडा क्षेत्रात सुपर पॉवर व्हायला थोडा वेळ लागेल, पण त्यासाठी सर्वांनीच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत असेही उषाने सांगितले.

मुलांनो मोबाईल सोडून मैदानात उतरा

शाळकरी मुलांनी मोबाईल आणि टीव्ही कार्यक्रमांचे वेड सोडून मैदानात उतरायला हवे आणि पालकांनीही त्यासाठी मुलांचे मनपरिवर्तन करायला हवे असे सांगून उषा म्हणाली, देशात आता जुनियर स्तरावर हिमा दास, द्युती चंदसारख्या टॅलेंटेड धावपटू चमकदार कामारी करीत आहेत त्याचाच आनंद आहे. उत्तर प्रदेशची धावपटूसुद्धा सिंह हिचीही कामगिरी युवा पिढीला प्रेरणा मिळावी अशीच होत आहे. हिमाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत जागतिक अजिंक्यपद ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिची कामगिरी खरोखरच देशवासीयांना अभिमान वाटेल अशीच आहे, असेही कौतुकाचे उद्गार उषाने यावेळी काढले.