कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश

सामना ऑनलाईन । जम्मू-कश्मीर
जम्मू-कश्मीरच्या बनिहाल जिल्ह्यात शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे. आरिफ आणि गजनफर अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत. या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच बनिहालमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता, तर एक जवान जखमी झाला होता.
सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवरील हल्ल्यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला होता. पोलिसांचा तपास सुरू असताना दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश आलं आहे. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून रायफल्स आणि बनिहालमधील हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शोपियान सेक्टरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात हिंदुस्थानी सैन्याला यश आलं होतं.