चीनच्या सीमेवर हिंदुस्थानने आणखी सैन्य तैनात केले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

डोकलामवरून हिंदुस्थान आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांना लागून असलेल्या चीनच्या सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोकलाम वादावरून चीनच्या वाढत्या धमक्यांना उत्तर देण्यासाठी चीनशी जोडलेल्या सिक्कीम ते अरुणाचल या १४०० किमी सीमेवर सैनिकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिक्कीम आणि अरुणाचल या राज्यांच्या सीमारेषा चीनशी जोडलेल्या आहेत. चीनच्या वाढत्या धमक्यांना उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानी जवान सक्षम आहे. चीनने डोकलाममध्ये अतिरिक्त सैन्य आणि तंबू उभारल्याचे लक्षात आल्यानंतर हिंदुस्थानने युद्धसज्जतेसाठी सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. सिक्कीम आणि अरुणाचलसह आसामच्या काही भागांमध्येही जवांनाना तैनात करण्यात आले आहे. मात्र किती प्रमाणात सैन्य सीमेवर उभे आहे याबाबत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या दिवसांत डोकलामसह हिंदुस्थान-चीन सीमेवरील बऱ्याच मोठ्या भागात हळू-हळू थंडी वाढू लागेल. तिथल्या थंड वातावरणाशी जुळवून घेतलेले ४५ हजार सैनिक सीमा परिसरात आहेत. मात्र सर्वच सैनिक सीमेवर तैनात केलेले नाही. समुद्रसपाटीपासून ९ हजार फुटांवर असणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जवानांना १४ दिवसांच्या कडक प्रक्रियांमधून जावे लागते.

चीनकडून मागील काही दिवसांमध्ये युद्धाचा सातत्याने इशारा देण्यात येत आले. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स आणि त्याचे संपादक यांनीही काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानने कोणत्याही अटींशिवाय सैन्य माघारी घ्यावे अन्यथा युद्धाशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे हिंदुस्थान खबरदारीचे उपाय म्हणून सैन्याला सज्ज ठेवत असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.