नेहराच्या विजयी निरोपासाठी ‘टीम इंडिया’ सज्ज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चुरशीच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर ‘टीम इंडिया’ आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेसाठी सज्ज झाली आहे. बुधवार, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सलामीची लढत रंगणार आहे. लोकल बॉय आणि संघातील वेगवान गोलंदाज आशीष नेहरा याच मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्यामुळे संघातील या सर्वात बुजुर्ग खेळाडूला विजयाने निरोप देण्यासाठी त्याचे सहकारी मैदानावर जिवाचे रान करण्यात कुठलीच कसर सोडणार नाहीत एवढे नक्की. मात्र  हिंदुस्थानला अद्याप न्यूझीलंडविरुद्ध एकही टी-२० सामना जिंकता आलेला नसल्यामुळे उद्याची लढाई नक्कीच सोपी नसेल.

१९ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱया आशीष नेहराने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये अखेरचा टी-२० सामना खेळला होता. मात्र त्याने आधीच निवृत्तीची घोषणा केल्याने उद्याच्या लढतीत तो नक्कीच खेळेल. नेहराने अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारी २००४मध्ये, तर अखेरचा एकदिवसीय सामना २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळलेला आहे. ‘आयपीएल’मधील प्रभावी कामगिरीच्या जोरावर नेहराने टी-२० संघात नेहमीच स्थान मिळविले. मात्र आता थांबण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ३८ वर्षीय नेहराला कळून चुकले आहे.

‘टीम इंडिया’ने मागील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांडय़ा, युजवेंद्र चहल व कुलदीप यादव या गोलंदाजांना खेळविले होते, पण न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय लढतीत भुवनेश्वर कुमार अपयशी ठरला होता. त्यामुळे नेहरासाठी उद्या त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान व न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत पाच टी-२० सामने झाले असून यात एकदाही हिंदुस्थानला विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे नेहराला उद्या विजयी निरोप दिल्यास हिंदुस्थानचा न्यूझीलंडविरुद्धचा हा पहिलाच विजय ठरणार आहे.

उभय संघ

हिंदुस्थान  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडय़ा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, आशीष नेहरा, अक्षर पटेल, लोकेश राहुल.

न्यूझीलंड  केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रॅण्डहोम, मार्टिन गप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, ऍडम मिल्ले, कॉलिन मुनरो, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊथी.