हिंदुस्थानचा विजयरथ रोखला, टी-20 मालिकेत न्यूझीलंडची 2-1 ने बाजी

सामना ऑनलाईन । हॅमिल्टन

न्यूझीलंड दौऱ्यावर टी-20 क्रिकेट मालिका जिंकण्याचे ‘टीम इंडिया’चे स्वप्न रविवारी भंगले. न्यूझीलंडने तिसऱया व निर्णायक सामन्यात हिंदुस्थानवर 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 2-1 फरकाने जिंकली. याचबरोबर न्यूझीलंडने सलग 10 टी-20 मालिका जिंकणाऱया हिंदुस्थानचा विजयरथ अखेर रोखला. 72 धावांची धडाकेबाज खेळी करणारा कॉलिन मुन्रो सामनावीर ठरला, तर मालिकावीराची माळ टिम सिफर्टच्या गळ्यात पडली.

कार्तिक-कृणाल लढले, पण…
धोनी बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक आणि कृणाल पांडय़ा यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. या दोघांनी टॉप गेअरमध्ये फलंदाजी करीत चेंडू आणि धावांतील अंतर कमी केले. मात्र, नाबाद 63 धावांची भागीदारी करूनही ते हिंदुस्थानला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. कार्तिकने 16 चेंडूंत नाबाद 33 धावांची खेळी करताना 4 षटकारांचा घणाघात केला. कृणाल पांडय़ाने नाबाद 26 धावांच्या खेळीत 13 चेंडूंत 2 षटकार व तितकेच चौकार लगावले.

हार्दिक बाद, धोनी फ्लॉप
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात स्कॉट कुगेलेझिंगने 11 चेंडूंत 2 षटकार व एका चौकारासह 21 धावांची खेळी करणाऱया हार्दिक पांडय़ाला केन विल्यम्सनकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला पाचवे यश मिळवून दिले. त्यानंतर डॅरिल मिशेलने महेंद्रसिंग धोनीला (2) टीम साऊथीकरवी झेलबाद करून हिंदुस्थानची 15.2 षटकांत 6 बाद 145 अशी अवस्था केली.

शंकर, पंतची मुक्तछंदी फलंदाजी
न्यूझीलंडकडून मिळालेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. मिशेल सॅण्टनरने पाचव्याच चेंडूवर शिखर धवनला (5) सीमारेषेवर डॅरिल मिशेलकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर दुसरा आघाडीवीर रोहित शर्मा (38) व विजय शंकर (43) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 75 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानचा डाव सावरला. सॅण्टनरने विजयला ग्रॅण्डहोमकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली.

विजयने 28 चेंडूंच्या आक्रमक खेळीत 5 सणसणीत चौकारांसह 2 टोलेजंग षटकार लगावले. विजय शंकरच्या जागेवर आलेल्या रिषभ पंतने 12 चेंडूंना सामोरे जाताना 3 षटकार व एका चौकारासह 28 धावांची देणखी खेळी केली. रोहित शर्माने एका बाजूने स्ट्राईक द्यायचे काम केल्याने विजय व पंत यांना मुक्तछंदात फलंदाजी करता आली. ब्लेयर टिकनरने पंतला विल्यम्सनकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला मोठे यश मिळवून दिले.

रोहितची विकेट ठरली टर्निंग पॉईंट
चौथ्या स्थानावर बढती देण्यात आलेल्या हार्दिक पांडय़ाने टिकनरचे षटकाराने स्वागत करून आपले इरादे स्पष्ट केले. मात्र, कर्णधार रोहित शर्मा डॅरिल मिशेलच्या बाहेर जाणाऱया चेंडूवर चकला अन् यष्टीमागे सेइफर्टने झेल टिपत न्यूझीलंडच्या मार्गातील मुख्य अडसर दूर केला. रोहितने 32 चेंडूंच्या संयमी खेळीत 3 चौकारांसह 38 धावा केल्या. फलंदाजीचा गेअर बदलण्यापूर्वीच रोहित शर्मा बाद झाला अन् हाच सामन्याचा खऱया अर्थाने टर्निंग पॉइंट ठरला.

हॅमिल्टनवर एकाच दिवशी हिंदुस्थानी महिला, पुरुष संघांना पराभवाचा झटका
हिंदुस्थानी क्रिकेट संघांच्या न्यूझीलंड दौऱयाचा आज शेवट झाला. अखेरच्या टी-20 सामन्यात हॅमिल्टनवर हिंदुस्थानी पुरुष संघाला न्यूझीलंडने 4 धावांनी पराभूत करीत मालिकेत 2-1 ने बाजी मारली, तर सकाळी हॅमिल्टनच्याच मैदानात हिंदुस्थानी महिलांना पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या महिलांनी हिंदुस्थानी महिलांवर 3-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मात्र एकाच दिवशी हिंदुस्थानच्या दोन्ही संघांना स्वीकाराल्या लागलेल्या पराभवात एक अजब योगायोग जुळून आला आहे.

पुरुष आणि महिला संघांना अंतिम षटकात विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. मात्र दोघांपैकी एकालाही हे लक्ष्य पार करता आलेलं नाही. महिलांनी 16 पैकी 13 तर पुरुष संघाने 16 पैकी 11 धावा केल्या. कृणाल पांडय़ा आणि दिनेश कार्तिक यांच्याकडे आपल्या संघाची नौका पार करण्याची चांगली संधी होती. मात्र तिचा फायदा घेणं त्यांना जमलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या