हिंदुस्थान-चीनने कुत्रा, मांजराच्या मटणावर बंदी घालावी!

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

हिंदुस्थान, चीन, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम या देशांनी कुत्रा आणि मांजराच्या मटणावर बंदी घालावी, असा ठराव अमेरिकन काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी सभागृहाने मंजूर केला आहे. कुत्रा आणि मांजर माणसांचे साथीदार असून, त्यांना खाण्याच्या सवयीला समाजात स्थान असू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेत कुत्रा आणि मांजराची कत्तल आणि मांस खाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिकन काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी सभागृहाने कुत्रा आणि मांजर मटण व्यापार बंदी कायदा (२०१८) आवाजी मतदानाने मंजूर केला. या कायद्यात कुत्रा आणि मांजराचे मटण विक्री करणाऱ्यास ५००० डॉलर्स (सुमारे ३.५ लाख रुपये) दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे आता हिंदुस्थान, चीनला कुत्रा आणि मांजराचे मास अमेरिकेला निर्यात करता येणार नाही. कुत्रा आणि मांजर हे माणसाचे मित्र आहेत. त्यामुळे या प्राण्यांची मटणासाठी कत्तल करणे अमानुष असल्याचे अमेरिकन काँग्रसने म्हटले आहे.

काय आहे कुत्रा, मांजराच्या मटणाचा व्यापार

कोंबड्या, बकऱ्या, मेंढ्यांप्रमाणेच जगामध्ये अनेक देशांत कुत्रा- मांजराचे मटण खाल्ले जाते. त्यामुळे अनेक देशांत या प्राण्याच्या मोठ्या प्रमाणावर कत्तली केल्या जातात. या मटणाचा मोठा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे.

चीनमध्ये वर्षाला तब्बल एक कोटी कुत्र्यांची कत्तल मटणासाठी केली जाते, या कुत्र्यांचा मटणासाठी चीनमध्ये पोल्ट्री फार्मप्रमाणे डॉग फार्म उभारले आहेत, अशी माहिती अमेरिकन काँग्रेसमध्ये एका सेनेटरने दिली.

हिंदुस्थानातूनही मोठ्या प्रमाणावर कुत्रा आणि मांजराचे मांस निर्यात केले जाते. हिंदुस्थानातील उत्तर-पूर्व भागात नागालँड, मिझोराम आणि मणिपूरमध्ये कुत्र्याचे मांस खाल्ले जाते.

जगामध्ये दरवर्षी ३ कोटी कुत्र्यांची कत्तल मटणासाठी केली जाते. यात चीन आघाडीवर आहे.