फेसबुकने शोधून दिल्या हरवलेल्या म्हशी

सामना ऑनलाईन । बंगळुरू

सध्या सोशल मीडियाचे वारे चांगलेच वाहत असून लहानथोरांपासून सारेच जण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले दिसतात. सोशल मीडिया अॅपमध्ये इतर अॅपच्या तुलनेत फेसबुकचा वापर तर अगदी सर्रास होताना दिसतो. फेसबुकवर अनेक गोष्टी आपल्या मित्रमंडळींशी शेअर करता येतात. फेसबुकमुळे अनेक हरवलेले मित्र आपल्याला सापडतात. अनेक नवी नातीही फेसबुकवरून जोडली जातात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. पण हरवलेल्या म्हशी फेसबुकमुळे सापडल्या आहेत, असे कधी ऐकले आहे का? जरा विचित्र वाटेल पण अशी एक घटना बंगळुरूमधील होसाकोटे तालुक्यातील एका गावात घडली आहे. फेसबुकमुळे चक्क हरवलेल्या दोन म्हशी सापडल्या आहेत.

सोमवारी संध्याकाळी चरताना दोन म्हशी चाऱ्याच्या शोधात दुसऱ्याच गावी पोहोचल्या. चरण्यासाठी गेलेल्या म्हशी परत न आल्याने मालकाने त्यांना शोधण्यास सुरुवात केली. शेजारील गावांत शोध घेतला तरी म्हशी सापडल्या नाहीत. अखेर दोन दिवसांनी फेसबुकवर हरवलेल्या म्हशी कोणाच्या? अशी पोस्ट दिसली. या म्हशी चरता-चरता १० किलोमीटर लांब असणाऱ्या गावात जाऊन पोहोचल्या होत्या. एका स्थानिकाने त्या म्हशींचा मालक शोधण्यासाठी फेसबुकचा वापर केला.

नारायण स्वामी या इस्तूरू गावात राहणाऱ्या ग्रामस्थाला फेसबुकचा वापर फायदेशीर ठरला. नारायणच्या दोन म्हशी चाऱ्याच्या शोधात १० किमी दूर असलेल्या कोद्राहल्ली गावात पोहचल्या होत्या. या गावातील ग्रामस्थ असलेल्या मोहनला या म्हशी चरताना आढळल्या. आपल्या गावातील म्हशी नसल्याची खात्री झाल्यानंतर मोहनने म्हशींच्या मालकांचा शोध घेण्याचे ठरवले. मालकापर्यंत पोहचण्यासाठी मोहनने फेसबुकची मदत घेण्याचे ठरवले. त्याने या म्हशींचे फोटो अपलोड केले आणि ‘ह्या म्हशी त्यांच्या मालकापर्यंत पोहचेपर्यंत पोस्ट शेअर’ करण्याचे आवाहनही केले. अर्थातच मोहनच्या या पोस्टला चांगला प्रतिसाद लाभला आणि ही पोस्ट नारायण स्वामीपर्यंत पोहचली. आपल्या म्हशी सुखरुप असल्याचे पाहून नारायणच्या जीवात जीव आला.