हिंदुस्थान विजयासाठी सज्ज

सामना ऑनलाईन । साऊथम्पटन

एजबॅस्टन व लॉर्डस् येथील दोन कसोटी सामन्यांत पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने नॉटिंगहॅम कसोटी 203 धावांनी जिंकून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत झोकात पुनरागमन केले. आता आजपासून साऊथम्पटन येथे चौथ्या कसोटीला सुरुवात होणार असून या कसोटीत विजय मिळवून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यासाठी पाहुणा संघ सज्ज झालाय. यजमान इंग्लंडचा संघ मात्र चौथ्या कसोटीत विजय संपादन करून मालिका खिशात घालण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल. 0-2 अशा फरकाने पिछाडीवर राहिल्यानंतर 3-2 अशा फरकाने मालिका जिंकण्याची करामत आतापर्यंत फक्त सर डॉन ब्रॅडमन यांच्या ऑस्ट्रेलियाने केली आहे. त्यांनी 1936 साली इंग्लंडला हरवले होते. विराट कोहलीच्या सेनेला याची पुनरावृत्ती करण्याची संधी असणार आहे.

100 चेंडूचे क्रिकेट नको; व्यावसायिकरणामुळे नुकसान – विराट
क्रिकेटचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी कसोटी, वन डेपाठोपाठ ट्वेण्टी-20 चा जन्म झाला. मात्र क्रिकेटच्या या नव्या प्रकारामुळे क्रिकेटप्रेमी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवू लागले आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडमध्ये 100 चेंडूंच्या क्रिकेटला 2022 सालामध्ये सुरुवात होणार आहे. यावर टीम इंडियाच्या कर्णधाराला विचारले असता तो म्हणाला, 100 चेंडूंच्या क्रिकेटमध्ये सहभागी व्हायचे नाही. अति क्रिकेट हा चिंतेचा विषय नाही, पण क्रिकेटमधील व्यावसायिकरणाला माझा विरोध आहे. त्यामुळे खेळाचे नुकसान होत आहे, असे स्पष्ट आणि परखड मत पुढे त्याने व्यक्त केले.

आजपासून चौथी कसोटी

हिंदुस्थान-इंग्लंड, दुपारी 3.30 वाजता