दक्षिण आफ्रिकेचा दौरा आव्हानात्मक, फलंदाजांची परीक्षा – रवी शास्त्री

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

श्रीलंकेसोबत तीन टी-२० सामन्यांची मालिका संपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ महत्त्वपूर्ण अशा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी हिंदुस्थानी संघात वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. या निवडीचे हिंदुस्थानचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी समर्थन केले आहे. मात्र या मालिकेमध्ये दोन्ही संघाचे फलंदाज कशी कामगिरी करतात यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच हिंदुस्थानी संघ या दौऱ्यात मागील सर्व खराब कामगिरी धुऊन, असे शास्त्री यांनी सांगितले.

‘हिंदुस्थानी संघासाठी येणारे १८ महिने महत्त्वाचे आहेत. या काळात हिंदुस्थानचा संघ दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यावर जाणार आहे’, असे शास्त्री म्हणाले. ‘हिंदुस्थानी संघाची मागील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी चांगली नसली तरी आमचा संघ सध्या कात टाकतोय. आमच्याकडे चांगले गोलंदाज असल्याने येणाऱ्या काळात हिंदुस्थानचा संघ विदेशात चांगली कामगिरी करेल’, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.

‘संघामध्ये चांगले गोलंदाज असून हार्दिक पांड्याच्या रुपात एक सक्षम अष्टपैलूही आहे. विदेशामध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करणारा आणि गोलंदाजी करणारा खेळाडू संघासाठी कधीही महत्त्वाचा असतो. विदेशात विरुद्ध संघाचे २० बळी घेऊ शकतील असे गोलंदाज संघात असणे फायद्याचे आहे. तुम्ही कितीही धावा केल्या तरी विरुद्ध संघाच्या २० विकेट न घेता जिंकू शकत नाही, असे म्हणत शास्त्रींनी हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांवर विश्वास व्यक्त केला आहे.