INDvAUS ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलला संधी, मुंबईकर रहाणेची वर्ल्ड कपची आशा मावळली

सामना प्रतिनिधी । मुंबई

इंग्लंड आणि वेल्समध्ये येत्या 30 मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीची अखेरची चाचणी मानली जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील टी-20 आणि वन डे क्रिकेट मालिकांसाठी टीम इंडियाची निवड शुक्रवारी करण्यात आली. या मालिकांसाठीच्या संघात कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर के.एल. राहुल यांनी पुनरागमन साजरे केले आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेला मात्र या संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे विश्वचषकाचे तिकीट मिळविण्याची त्याची अखेरची आशाही संपुष्ठात आली आहे.

INDvAUS ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 व वन डे मालिकेसाठी संघ जाहीर, कोणाला मिळाली संधी?

याआधी निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत, अष्टपैलू विजय शंकर आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेची निवड होऊ शकते असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध रहाणेला संधी मिळण्याची शक्यता होती. परंतु रहाणेऐवजी सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या के.एल. राहुलला संधी देण्यात आली आहे. नेटकऱ्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

पाहूणा कांगारू संघ यजमान हिंदुस्थानी संघाविरुद्ध 2 टी-20 आणि 5 वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाआधी ही हिंदुस्थानची अखेरची स्पर्धा आहे. त्यामुळे संघातील काही विशिष्ट जागांवर लक्ष केंद्रित केल्याचे संघनिवडीवरून उघड झाले आहे. टी -20 संघात फिरकीवीर मयांक मार्कंडेयची निवड मात्र आश्चर्यकारक मानली जात आहे.