श्रीलंकेवरील विजयामुळे जागतिक क्रमवारीत हिंदुस्थानी खेळाडूंची रॉकेटउडी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानने निर्भेळ यश मिळवले होते. मुंबईमध्ये झालेल्या अंतिम टी-२० सामन्यात हिंदुस्थानने लंकेचा ५ विकेटने पराभव केला होता. लंकेवरील निर्भेळ यशाचा फायदा हिंदुस्थानी संघाला आणि खेळाडूंना आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत हिंदुस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

लंकेला व्हाईटवॉश दिल्याने आयसीसीकडून हिंदुस्थानला २ गुण देण्यात आले आहेत. यामुळे हिंदुस्थानचा संघ क्रमवारीत १२१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. रोहित सेनेने इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे आणि त्यांचे १२४ गुण आहेत.

खेळाडूंच्या क्रमवारीत सुधारणा
लंकेविरुद्ध मिळवलेल्या निर्भेळ यशाचा फायदा हिंदुस्थानच्या खेळाडूंनाही झाला आहे. मालिकाविराचा पुरस्कार मिळालेला कर्णधार रोहित शर्मा सहा स्थानांच्या सुधारणेसह १४व्या नंबरवर पोहोचला आहे, तर के.एल राहुलने २३ स्थानांची हनुमान उडी घेत क्रमवारीत चौथा नंबर मिळवला आहे.