मोबाईल नंबर आता होणार १३ आकडी

mobile-phone

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एखाद्याचा टेलिफोन नंबर लक्षात ठेवणं ही सध्याच्या स्मार्ट युगात जिकीरीची बाब. टेलिफोनचे ८ आकडे, मोबाईलचे १० आकडे आणि त्याला २ अंकी कोड हे सगळे आठवता आठवता अगदी नाकी नऊ येतात. आता हे आकडे १० वरून १३ झाले आहेत. काय, तुम्हाला विश्वास बसत नाहीये? पण, ही बातमी खरी आहे ! लवकरच मोबाईल नंबर १३ आकडी होणार आहे, असे पत्र भारतीय संचार निगम लिमिटेडतर्फे जाहीर करण्यात आले.

१३ आकडी नंबरमुळे स्मार्ट वीजमीटर व कार ट्रॅकिंग डिव्हायसेस यांना आपण सोप्या पद्धतीने लवकरात लवकर संवाद साधू शकतो. तसेच मशीन टू मशीन कम्युनिकेशनसाठी या आकड्यांचा उपयोग होतो. सध्या दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना या १३ आकडी मोबाईल नंबरचे परीक्षण करण्यास सांगितले आहे. बीएसएनएल, भारती एअरटेल, रिलायंस जिओ, आयडिया सेल्युलर, व्होडाफोन या कंपन्या सध्या १३ आकडी नंबरची चाचणी करत आहेत.

मशीन टू मशीन सिमकार्ड ऑटोमेटेड मशीनमध्ये वापरले जाते. त्यासाठी नेटवर्क कनेक्टीव्हिटीवर चालणाऱ्या मशीनसाठी त्याचा जादा वापर होतो. या मशीनची रेंज छोट्या गॅजेट पासून मोठ्या मशीनपर्यंत असू शकते. मात्र त्यासाठी ही मशीन काम करताना इंटरनेट अथवा मोबाईल नेटवर्क कनेक्टीव्हिटीची गरज आहे. १ जुलैपासून या चाचणीला सुरुवात झाली आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर १ ऑक्टोबर पासून मोबाईलधारकांचे नंबर १३ आकडी करण्यात येतील.