#INDvAUST20 विराटसेना विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज, उद्या पहिला सामना

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात उद्यापासून होणार आहे. उद्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. जागतिक क्रमवारीमध्ये टीम इंडिया पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे. परंतु मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीला अधिक महत्त्व नसल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाला यजमान असल्याचाही फायदा मिळेल. त्यामुळे विराट सेनेला विजयी पताका फडकावण्यासाठी सर्वस्व झोकून द्यावे लागणार आहे.

‘विराट’ सेनेला कांगारू घाबरले; स्मिथ, वॉर्नरला संघात घेण्यासाठी फिल्डिंग

खोलवर फलंदाजी, धारधार गोलंदाजी

ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन यजमानांचा पराभव करण्याची नामी संधी विराट कोहली अँड कंपनीकडे आहे. टीम इंडियाकडे जागतिक पटलावर खणखणीत वाजलेले अव्वल दर्जाचे फलंदाज आणि गोलंदाज आहे. टी-20मध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यांनी आपल्या फलंदाजींने भल्याभल्या गोलंदाजांचे वाभाडे काढले आहेत. टीम इंडियाची फलंदाजी खोलवर असल्याने मोठी धावसंख्या रचून विरोधी संघाला कोंडीत पकडण्याची संधी विराटसेनेकडे आहे. गोलंदाजीमध्ये बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, कुलदीप यादव, चहल हे कोणत्याही फलंदाजीला सुरुंग लावण्यास सक्षम आहेत. युवा वेगवान गोलंदाज खलिल अहमद याने विंडीजविरुद्ध धारधार गोलंदाजी करत सर्वांनाच भूरळ घातली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर त्यांची गोलंदाजी टीम इंडियाला फायदा मिळवून देऊ शकेल.

फोटो : कांगारुंना चित करण्यासाठी विराट सेना सज्ज

विजयाची संधी, पण या ऑसी खेळाडूंपासून सावधान

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाला विजयाची संधी असली तरी यजमान संघाला कमी लेखण्याची चूक विराट करणार नाही. ऑसी संघात आक्रमक फलंदाजांचा भरणा आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा कर्धणार अॅरॉन फिंच, डर्सी शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल, अॅड्रूय टाय आणि अॅडम झिम्पा यापासून सावध रहावे लागणार आहे.

टी-20 साठी टीम इंडियाचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, वाशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, बुमराह, उमेश यादव, खलिल अहमद.

हिंदुस्थान वि. ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका –
पहिला सामना : 21 नोव्हेंबर (ब्रिस्बेन)
दुसरा सामना : 23 नोव्हेंबर (मेलबर्न)
तिसरा सामना : 25 नोव्हेंबर (सिडनी)