क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल! डॉ. विजय पाटील यांचा दृढविश्वास

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

अमेरिका, रशिया, चीन हे देश जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्याआधी क्रीडा क्षेत्रात ‘सुपर पॉवर’ म्हणून जगासमोर आले. हिंदुस्थानलाही आता तशीच वाटचाल करावी लागेल. फिफा अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाने देशाने क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. भविष्यात आपला देश निश्चितच क्रीडा क्षेत्रात महाशक्ती म्हणून उदयास येईल, असा दृढविश्वास नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी व्यक्त केला. फिफा कुमार विश्वचषक लढतीचे यजमानपद नवी मुंबईने मिळवलेय. तो केवळ आमच्या स्टेडियमचा नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा बहुमान आहे, असेही डॉ. पाटील म्हणाले.

हिंदुस्थानातील ‘फिफा’ अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई, नवी मुंबईसह देशभरात हायटेक पायाभूत सुविधांचा पाया क्रीडा संघटक व शासनाने रचला आहे. देशातील युवा फुटबॉलपटूंनी चमकदार कामगिरी नोंदवून या पायावर यशाचा कळस रचावा असे आवाहनही डॉ. विजय पाटील यांनी केले आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमला ‘फिफा’ कुमार विश्वचषक लढतींचे यजमानपद मिळाले ही अवघ्या महाराष्ट्राला भूषण वाटावे अशी बाब आहे असे सांगून नवी मुंबई व मुंबई फुटबॉल अरीनाला फिफा विश्वचषकाचे यजमानपद हा एम्डीएफए, विफाच्या कार्याचा गौरवच असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी व कुस्ती या खेळांवर विशेष प्रेम करणारे डॉ. विजय पाटील यांनी गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे व हायटेक सुविधा असलेल्या नेरूळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमला नवा साज देण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. केवळ क्रिकेटच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम म्हणून डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचा कायापालट करण्याची किमया दोन ते तीन वर्षांत त्यांनी साधली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (फिफा) आणि अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) डॉ. विजय पाटील यांच्या कार्याची दखल घेत डी. वाय. पाटील स्टेडियमला फिफा कुमार विश्वचषक फुटबॉल लढतींचे यजमानपद बहाल केले आहे. आपल्या या यशात मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल संघटनेचे (एमडीएफए) अध्यक्ष आदित्य ठाकरे व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सीईओ हेन्री मेनेझिस यांच्या बहुमूल्य सहकार्याचा सिंहाचा वाटा असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

नवी मुंबईतील फिफा लढती हिटच ठरणार
फिफा कुमार विश्वचषकाच्या यजमानपदाने मुंबईसह महाराष्ट्रात फुटबॉल फिवर पसरलाय. नवी मुंबईत यजमान हिंदुस्थानी युवा संघाच्या लढती प्राथमिक फेरीत होणार नसल्या तरी जगातल्या बलाढय़ संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील फुटबॉल लढती सुपरडुपर हिट ठरतील. हिंदुस्थानी संघ अंतिम १६ संघांत आल्यास यजमानांचा खेळही नवी मुंबईत पाहायला मिळेल, असे प्रतिपादन डॉ. पाटील यांनी केले.

पायाभूत सुविधा विकासाचे कार्य सुरूच ठेवणार
देशात क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी पायाभूत सुविधा विकासाचे काम आपण ‘फिफा’ कुमार विश्वचषकानंतरही सुरू ठेवणार असल्याचे सांगून डॉ. विजय पाटील म्हणाले, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर बहुउद्देशीय क्रीडा केंद्रे व स्टेडियम्स हिंदुस्थानातही उभे राहावे अशी माझी धारणा आहे. त्या दृष्टीने डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये कुस्ती आणि कबड्डीच्या महास्पर्धाही खेळवल्या जाव्यात. क्रिकेटसोबत फुटबॉल व अन्य खेळांसाठीही या स्टेडियमचा वापर व्हावा असे मनोमन वाटतेय.

आदित्य ठाकरे यांच्या कल्पक नेतृत्वामुळेच मुंबई अरीनाचा विकास
एमडीएफए अध्यक्ष, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कल्पक नेतृत्वामुळेच मुंबईत फुटबॉलला नवी चेतना लाभलीय. त्यांच्या क्रीडाप्रेमी धोरणामुळेच मुंबईत कुपरेज, अंधेरीचे शहाजी राजे क्रीडा संकुल, परळचे सेंट झेवियर मैदान व वांद्रे येथील नेव्हील डि’सोझा मैदान अशी हायटेक फुटबॉल क्रीडांगणे विकसित झाली आहेत. मुंबई फुटबॉल अरीनाच्या विकासात एमडीएफए, विफा या संघटनांचा सिंहाचा वाटा आहे, असे कौतुकही डॉ. विजय पाटील यांनी केले.