ऍडलेडमधील विजयाचा दुष्काळ संपविणार काय?

संग्रहीत फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या बहुचर्चित कसोटी क्रिकेट मालिकेस उद्या, गुरुवारपासून प्रारंभ होईल. हिंदुस्थानने या मैदानावर 1948 मध्ये पहिली कसोटी खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत ‘टीम इंडिया’ने ऍडलेड मैदानावर 11 कसोटी सामने खेळले. त्यातील सात कसोटींत हिंदुस्थानला पराभवाचे तोंड पाहावे लागले. हिंदुस्थानने डिसेंबर 2003 मध्ये या मैदानावर एकमेव विजय मिळवलेला आहे. त्यामुळे तब्बल 15 वर्षांनंतर ‘टीम इंडिया’ या मैदानावरील विजयाचा दुष्काळ संपविणार काय? याकडे तमाम हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांच्या नजरा असतील.

70 वर्षांनंतर मालिका जिंकण्याची संधी
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हिंदुस्थानला गेल्या 70 वर्षांत एकदाही कसोटी क्रिकेट मालिका जिंकता आलेली नाही. आतापर्यंत केलेल्या 11 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हिंदुस्थानने केवळ दोन कसोटी मालिका बरोबरीत सोडविल्या आहेत. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली 1980-81 आणि त्यानंतर सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2003-04 मध्ये हिंदुस्थानने मालिका बरोबरीत सोडविण्याचा पराक्रम केलेला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ व सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांच्या गैरहजेरीत कमकुवत झालेल्या ऑस्ट्रेलियाला नमविण्याची यावेळी विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ला संधी असेल.

विराटला खुणावतायेत दोन विक्रम
कर्णधार विराट कोहलीला ऍडलेड कसोटीत दोन विक्रम खुणावत आहेत. विराटने या मैदानावर तीन शतकांसह 394 धावा फटकावल्या आहेत. ऍडलेडवर सर्वाधिक धावा करणाऱ्या हिंदुस्थानी फलंदाजांमध्ये कोहली दुसऱ्या स्थानी आहे. अव्वल स्थानी असलेल्या राहुल द्रविडने चार कसोटींत एक शतकासह 401 धावा केल्या आहेत. म्हणजे विराटला या मैदानावर सर्वाधिक धावा करण्यासाठी केवळ 8 धावांची गरज आहे. शिवाय ऑस्ट्रेलियामध्ये एक हजार कसोटी धावा करण्यासाठी विराट कोहलीला केवळ 8 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकर (1809), व्हीव्हीएस लक्ष्मण (1236) व राहुल द्रविड (1143) या तीनच हिंदुस्थानी फलंदाजांना एक हजारहून अधिक धावा करता आलेल्या आहेत. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये 8 कसोटी सामन्यांत 992 धावा केल्या आहेत.