असह्य उकाडय़ानंतरही ऑस्ट्रेलियाचा विजयीकोट, पाहुण्यांची हिंदुस्थानवर 66 धावांनी मात

चक्रावून सोडणारे ऊन तरीही ऑस्ट्रेलियाने राजकोटच्या असह्य उकाडय़ानंतरही हिंदुस्थानचा 66 धावांनी सहज पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत अखेर विजयीकोट घातलाच. हिंदुस्थानच्या नव्या दमाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर आज अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या उपस्थितीनंतरही हिंदुस्थानला पराभवाला सामोरे जावे लागले. मॅक्सवेलने टिपलेल्या 4 विकेटमुळेच ऑस्ट्रेलियाला हॅपी एंडिंगचे भाग्य लाभले.

ऑस्ट्रेलियाच्या 353 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माच्या फटकेबाजीमुळे वॉशिंग्टन सुंदरसह 74 धावांची सलामी दिली. मग रोहित (81) आणि विराटने (56) दुसऱया विकेटसाठी 70 धावांची भागी रचत हिंदुस्थानला विजयी ट्रकवर ठेवले होते, पण मॅक्सवेलने रोहितला बाद करून ही जोडीसुद्धा फोडली. पुढे विराटचा अडसर दूर केला आणि श्रेयस अय्यरची (48) ची विकेटही उडवत ऑस्ट्रेलियाचा विजयही निश्चित केला. त्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजांनी मान टाकली आणि पाहुण्यांनी वर्ल्ड कपपूर्वी हिंदुस्थानात आपल्या विजयाचे खाते उघडले.

तत्पूर्वी, मिचेल मार्शच्या तडाखेबंद 96 आणि डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनच्या जोरदार अर्धशतकी खेळींनी ऑस्ट्रेलियाला 7 बाद 352 अशी धावसंख्या उभारता आली. मुळात 27 व्या षटकांत संघाला द्विशतकी टप्पा गाठून देणाऱया ऑस्ट्रेलियाकडून 400 पेक्षा अधिक धावांची अपेक्षा होती, पण 200 धावानंतर पुढील 142 चेंडूंत केवळ 152 धावाच काढता आल्या.

ऑस्ट्रेलिया थंडावली

मिचेल मार्शच्या (96)  झंझावाताने ऑस्ट्रेलियाला षटकामागे 8 पेक्षा अधिक धावांची गती मिळवून दिली होती, पण राजकोटच्या घामटा काढणाऱया तापमानाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भंडावून सोडले. मार्शला शतकाची संधी होती, पण तो असह्य तापमानामुळे त्याची लय बिघडली आणि त्याने आपली विकेट गमावली. वॉर्नरने 8 षटकांच्या आपल्या सलामीत मार्शसह 78 धावांची भागी रचली. मग मार्शने स्टीव्हन स्मिथबरोबर 137 धावांची भागी केली.

स्टीव्ह स्मिथने पाच हजार वन डे धावा पूर्ण करताना 61 चेंडूंत 74 धावा ठोकल्या. तो खेळपट्टीवर असेपर्यंत ऑस्ट्रेलिया 400 चा टप्पा गाठणार असेच वाटत होते, पण स्मिथनंतर ऑस्ट्रेलियाला चाचपडली.