India vs Australia रोहितच्या नेतृत्वाचीच ‘कसोटी’

हिंदुस्थानी संघाच्या कसोटी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून रोहित शर्माला आता एक वर्ष पूर्ण होतेय आणि तो या वर्षभरात केवळ दोनच कसोटी खेळलाय. त्यामुळे नागपूरला होणाऱ्या कसोटीत हिंदुस्थानी संघाचीच नव्हे तर रोहितच्या कर्णधारपदाचीही कसोटी लागणार आहे, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

गेले वर्षभर त्याच्या कारकीर्दीत दुखापतींच्या सुरू असलेल्या लपंडावाने आता कलाटणी घेतली असून त्याच्या आणि संघाच्या यश-अपयशावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे हिंदुस्थानची नव्हे तर त्याच्या नेतृत्वाचीच खरी कसोटी नागपूर कसोटीपासून पाहायला मिळेल.

गेल्या वर्षी प्रारंभीच दक्षिण आफ्रिकेतील पराभवामुळे विराट कोहलीला कसोटी कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तेव्हा संघाची धुरा अनुभवी रोहितकडे सोपविण्यात आली. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त विजयासह आपल्या नेतृत्वाची दणदणीत सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर दुखापतींमुळे रोहित शर्माला अनेक मालिकांना मुकावे लागले. त्यातच रोहितची कसोटीतील कामगिरी फारशी समाधानकारक नसल्यामुळे त्याच्यासाठी आपले नेतृत्व आणि फलंदाजीचे सारे गुण पणाला लावावे लागणार आहेत.

रोहितच्या कसोटी कामगिरीविषयी…

  • हिंदुस्थान खेळलेल्या गेल्या दहा कसोटींपैकी आठ कसोटींना रोहित मुकलाय.
  • कर्णधार म्हणून केवळ दोन कसोटींतच तो खेळलाय आणि त्याने 29, 15 आणि 46 अशा धावा केल्या आहेत.
  • कर्णधार म्हणून तो खेळलेल्या दोन्ही कसोटीत हिंदुस्थान जिंकलाय आणि या दोन्ही कसोटी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेल्या होत्या.
  • एक फलंदाज म्हणून तो इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत खेळला होता आणि त्या कसोटीत त्याने दुसऱ्या डावात 127 धावांची खेळी करीत ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावला होता. हा कसोटी सामना हिंदुस्थानने जिंकत इंग्लंडविरुद्ध 2-1 ने संस्मरणीय मालिका विजयही नोंदविला होता.
  • कसोटीपेक्षा रोहितची वन डे आणि टी-20 तील कामगिरी जबरदस्त आहे.
  • गेल्या नऊ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत तो केवळ 45 कसोटी सामने खेळला आहे. ज्यात 46 च्या सरासरीने 3137 धावा केल्या आहेत. यात 8 कसोटी शतकांचा समावेश आहे. वन डे आणि टी-20 च्या तुलनेत त्याची कसोटीतील कामगिरी फारच सामान्य ठरते.

सूर्याला नागपूर कसोटीत खेळवा

हिंदुस्थानचा टी-20 क्रेकेटमधला धमाका असलेल्या सूर्यकुमार यादवला 9 फेब्रूवारीपासून सुरू होणाऱ्या नागपूर कसोटीत खेळवा. फिरकी गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टय़ांवर अत्यंत उपयोगी ठरत असलेली सूर्यकुमारची फलंदाजी हिंदुस्थानी डावाला फायदेशीर ठरू शकते, असा विश्वास माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. सूर्यासारखा बेधडक फलंदाज फिरकीसमोर जबरदस्त खेळतो. तो ऑस्ट्रेलियन फिरकीसमोरही निश्चितच चांगला खेळू शकतो. त्यामुळे नागपूर कसोटीत त्याच्या नावाचा विचार व्हायलाच हवा. त्याला संधी मिळायलाच हवी, असेही ते म्हणाले.