बांगलादेशविरुद्ध हा असेल हिंदुस्थानचा ‘अॅक्शन प्लॅन’

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेत सुरु असलेल्या निदास करंडक टी-२० तिरंगी मालिकेत आज हिंदुस्थानची लढत बांगलादेशशी होत आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिली लढत गमावल्यानंतर ही लढत हिंदुस्थानसाठी महत्त्वाची आहे. अर्थात टी-२०मध्ये हिंदुस्थान बांगलादेशच्या विरोधात एकदाही हरलेला नाही. त्यामुळे हा इतिहास हिंदुस्थानला नवं बळं देणारा आहे.

‘टॉप थ्री’वर जबाबदारी

शिखर धवन आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी कशी सुरुवात करणार हे हिंदुस्थानसाठी महत्वाचे ठरणार आहे. श्रीलंकेविरुद्ध शिखर धवनने ९० धावांची जबरदस्त खेळी केली होती. पण त्याला रोहित शर्माकडून साथ मिळाली नाही. रोहितचं वादळ आज घोंगावलं तर त्यामध्ये बांगलादेशचे बॉलर हे पाचोळ्यासारखे उडून जातील हे नक्की. शिखर-रोहित नंतर तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या अनुभवी सुरेश रैनावरही संघाची मोठी भिस्त असेल. रैनावर एक बाजू सांभाळून ठेवून धावगती कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

मधल्या फळीचा कस

मनिष पांडे, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या तिघांसाठीही या मालिकेतील प्रत्येक लढत ही महत्त्वाची ठरणार आहे. दुबळ्या बांगलादेश विरुद्धची मोठी खेळी या तिघांचाही आत्मविश्वास उंचावणारी ठरणार आहे.

फिरकीवर भिस्त

यजुवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी आजही खेळणार हे निश्चित आहे. बांगलादेशच्या फलंदाजांना फिरकी खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांना आज आपला खेळ उंचवावा लागणार आहे. धावा रोखणे आणि  त्यासोबतच विकेट्स काढणे अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर असेल

वेगवान गोलंदाजांची डोकेदुखी

मुंबईकर शार्दूल ठाकूरने मागच्या सामन्यात एकाच ओव्हरमध्ये २७ धावा दिल्या होत्या. त्यामुळे आज त्याला त्याची शिक्षा मिळण्याची शक्यता आहे. शार्दूलला वगळल्यास मोहम्मद सिराजचा टीममध्ये समावेश होऊ शकतो. जयदेव उनाडकतकडूनही संघाला मोठी अपेक्षा असेल.