आता लढाई प्रतिष्ठेची हिंदुस्थान-इंग्लंडमध्ये  आजपासून पाचवी कसोटी

सामना ऑनलाईन । लंडन

चौथ्या लढतीत पराभूत झाल्यानंतर कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती ओढवणार्‍या टीम इंडियाची उद्यापासून येथे सुरू होणार्‍या पाचव्या कसोटीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. एकीकडे यजमान इंग्लंडचा संघ 3-1 अशा फरकाने पुढे असून पाचवी कसोटीही जिंकण्यासाठी त्यांचा संघ सज्ज झाला असेल, तर दुसरीकडे विराट कोहलीची ब्रिगेड अखेरच्या कसोटीत विजय मिळवून दौर्‍याचा शेवट गोड करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल. तसेच आशिया कप, वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलिया या महत्त्वाच्या दौर्‍याआधी आत्मविश्वास संपादन करण्यासाठी या कसोटीतील विजय टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.  

कूकला देणार विजयी सलाम

ऑलिस्टर कूक या दिग्गज फलंदाजाची अखेरची कसोटी असल्यामुळे इंग्लंडचा संघ आपल्या संघसहकार्‍याला विजयाचे गिफ्ट देण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही. तसेच जॉनी बेअरस्टॉ हा या कसोटीत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे. मागील कसोटीत दुखापतीमुळे तो फक्त फलंदाज म्हणून सहभागी झाला होता. त्याच्या अनुपस्थितीत जोस बटलर याने यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडली.  

स्वीपच्या फटक्यांचा सराव

मोईन अलीच्या फिरकी गोलंदाजीसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. चौथ्या कसोटीत टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाने मोईन अलीच्या गोलंदाजीसमोर स्वीपचे फटके खेळले नाहीत. प्रशिक्षक स्टाफने ही बाब हेरून सरावादरम्यान फलंदाजांकडून स्वीपच्या फटक्यांचा सराव करवून घेतला.

 विहारी, जाडेजाला संधी?

टीम इंडियाच्या फलंदाजीसह गोलंदाजी विभागातही बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रविचंद्रन अश्विन अद्याप फिट झालेला नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाला संघात घ्यायचे की युवा हनुमा विहारीला स्थान द्यायचे या संभ्रमात संघ व्यवस्थापन असेल. हार्दिक पांडय़ालाही म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. हनुमा विहारीला संधी मिळाल्यास तो ऑफस्पीनर तसेच फलंदाज म्हणून टीम इंडियाला फायदेशीर ठरू शकतो.

 राहुल की पृथ्वी?

टीम इंडियाचे संघ व्यवस्थापन पाचव्या कसोटीत कोणाकोणाला संघात संधी देते हे पाहणे रंजक ठरणार आहे. लोकेश राहुलला चारही कसोटींत सपशेल अपयशाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे त्याला वगळून मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला संघात चान्स देण्यात येतो का हे पाहायला नक्कीच आवडणार आहे. असे झाल्यास पृथ्वी शॉचा हा पहिला कसोटी सामना असेल.