रोमहर्षक सामन्यात विजयासह हिंदुस्थानने टी-२० मालिका जिंकली

सामना ऑनलाईन । तिरुअनंतपुरम

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना केरळमधील तिरुअनंतरपुरम येथे खेळवण्यात आला. या सामन्यात हिंदुस्थानने किवी संघाचा ६ धावांनी पराभव केला. पावसाच्या व्यत्ययामुळे ८ षटकांच्या करण्यात आलेल्या या सामन्यात हिंदुस्थानने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ६८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र न्यूझीलंडचा संघ ६ बाद ६१ धावाच करू शकल्याने हिंदुस्थानने सामन्यासह मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

विजयासाठी ६८ धावांचा पाठलाग करताना किवी संघाचे सलामीवीर ८ धावांवर बाद झाले. गुप्टीलला भुवीने एका धावेवर बोल्ड केले, तर खतरनाक मुनरोला बुमराने रोहितकरवी ७ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर ग्रॅन्ड्होम (१७) वगळता एकही फलंदाज मोठी खेळी न करू शकल्याने पाहूण्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. हिंदुस्थानी गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. बुमराहने २, भुवी आणि कुलदिप यादवने प्रत्येकी एक बळी घेतली. चहलने २ षटकात ८ धावा देत आपली जबाबदारी यसस्वीरित्या निभावली. शेवटच्या षटकात विजयासाठी १८ धावांची आवश्यकता असताना पांड्याने फक्त ११ धावा देत संघाला विजय मिळवून दिला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या हिंदुस्थानची सुरुवात निराशाजनक झाली. संघाची धावसंख्या १५ झाली साउदीने शिखर धवन ६ आणि रोहित शर्माला ८ धावांवर बाद करत यजमानांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने ६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार ठोकत १३ धावा केल्या, मात्र झटपट धावा करण्याच्या नादात तो बाद झाला. पाठोपाठ श्रेयस अय्यरही ६ धावा काढून माघारी फिरला. मनिष पांडेने १७ आणि हार्दिक पांड्याने १४ धावा करत संघाची धावसंख्या ५ बाद ६७ पर्यंत पोहोचवली.